ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निप्पॉन प्रकल्पग्रस्तांच्या हाकेला बच्चू कडूंचा प्रतिसाद : दीप जलाओ आंदोलनातून संघर्षाचा इशारा!

सानुग्रह अनुदान, रोजगाराची हमी आणि त्रिपक्षीय करारासाठी आरपारच्या लढ्याची घोषणा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती :_ तालुक्यातील न्यू एरा क्लीनटेक कोल गॅसिफिकेशन प्रकल्प आणि न्यू ग्रेटा एनर्जी कंपनीमुळे प्रभावित झालेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांना आता आक्रमक नेतृत्वाची साथ मिळाली आहे. प्रकल्पग्रस्तांच्या हाकेला प्रतिसाद देत आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली दीपावलीच्या पूर्वसंध्येला दि.०६ रोज शुक्रवारी दीप जलाओ आंदोलन करण्यात आले. महिला आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी हातात दीप घेऊन कंपनी व शासनाचे लक्ष वेधले.

लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे यांच्या प्रयत्नातून आमदार बच्चू कडू यांनी आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी शेतकरी संघटना युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष ॲड. दीपक चटप, लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यासपीठावर संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रवीण सातपुते, शिवसेना जिल्हाप्रमुख युवराज धानोरकर, उपाध्यक्ष सुधीर सातपुते, मधुकर सावनकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन चेतन गुंडावार यांनी केले, तर प्रास्ताविक अनुप खुटेमाटे यांनी मांडले.

सानुग्रह अनुदान, स्थानिकांना रोजगाराची हमी आणि कंपनी, शासन व प्रकल्पग्रस्त यांच्यात त्रिपक्षीय करार या तीन प्रमुख मागण्यांवर आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका मांडली. या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास प्रथम गनिमी काव्याने आणि त्यानंतर थेट मैदानात उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा खणखणीत इशारा त्यांनी दिला.

अन्याय होत असेल तर सत्तेचा मोह न ठेवता संघर्ष करणार, असे स्पष्ट करत बच्चू कडू यांनी स्थानिक भाजप आमदारावरही निशाणा साधला. आम्ही आंदोलनात उतरल्याचा प्रकाश स्थानिक आमदाराच्या डोक्यात पडला, असा घणाघाती टोला त्यांनी लगावला. पोलिसांच्या दंडुकेशाहीला न घाबरता मुलाबाळांसह संघर्षासाठी तयार राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.

ॲड. दीपक चटप यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या न्याय्य असून कंपनी आणि शासनाकडून होणारा अन्याय सहन केला जाणार नाही, अशी ठाम भूमिका मांडली. तर मुकेश जीवतोडे यांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येत प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा उभारण्याचे आवाहन केले.

पंचक्रोशीतील असंख्य प्रकल्पग्रस्त शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. शिवसेना शिंदे गटाचीही लक्षणीय उपस्थिती दिसून आली. आंदोलन शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

निप्पॉन प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी आणि स्थानिक शेतकऱ्यांनी आंदोलन यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. आंदोलनाची कंपनी व शासनाने दखल न घेतल्यास भविष्यात अधिक तीव्र विरोध केला जाईल, असा इशारा देण्यात आला. या आंदोलनामुळे प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांना नव्याने वाचा फुटली असून, आता शासन आणि कंपनी काय निर्णय घेते, याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

*न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार – बच्चू कडू*

आमदार बच्चू कडू यांनी कंपनी व्यवस्थापनाला इशारा देताना सांगितले की, “प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही, तर गनिमी काव्याने कंपनीत घुसू!” शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्यांच्या हक्कांकडे दुर्लक्ष करणे सहन केले जाणार नाही. स्थानिकांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

पक्षीय राजकारण बाजूला ठेवून शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग आणि मजुरांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण सदैव तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले. अन्यायाविरोधातील आंदोलनात गुन्हे अंगावर घेण्याची आणि लाठी खाण्याचीही आपली तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. न्याय मिळाला नाही, तर कंपनीतील कामकाज सुरू होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

आमची माती, आमचा अधिकार!

जमीन आमची, हक्क आमचे!

स्थानिकांना न्याय मिळालाच पाहिजे!

*शासन आणि लोकप्रतिनिधींना गावबंदी, जिल्हाबंदी करू – अॅड. दीपक चटप*

अॅड. दीपक चटप यांनी आपल्या भाषणातून लोकप्रतिनिधी आणि शासनाच्या भूमिकेवर टीका केली. आमदार देवतळे यांनी आपली जबाबदारी पार पाडून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले असते, तर दिवाळीच्या दिवशी शेतकऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली नसती, असे ते म्हणाले.

शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी न्यायालयीन आणि रस्त्यावरील लढाईत आपण सदैव सोबत राहू, असे आश्वासन त्यांनी दिले. शासन आणि लोकप्रतिनिधींनी या प्रश्नांची दखल घेतली नाही, तर मंत्री व लोकप्रतिनिधींना गावबंदी आणि जिल्हाबंदी करण्यास वेळ लागणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

*प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी एकजुटीने लढा द्या – मुकेशभाऊ जीवतोडे*

मुकेशभाऊ जीवतोडे यांनी प्रकल्पग्रस्त शेतकरी, बेरोजगार युवक, कामगार आणि स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांवर एकजुटीने लढा देण्याचे आवाहन केले. स्थानिकांच्या हक्कांसाठी सर्वांनी एकत्र येऊन संघर्षात सहभागी व्हावे, असे त्यांनी सांगितले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये