थायलंडच्या ११० भिक्खूंच्या सहभागाने भद्रावतीत शांती संदेश धम्मयात्रेचे उत्साहात स्वागत!
ऐतिहासिक विज्जासन बुद्ध लेणीत धम्मदेशना : भदंत ज्ञानज्योती व त्यांच्या भिक्खू संघाचा सहभाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती :_ तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा शांती, करुणा, मैत्री, अहिंसा, समता आणि मानवकल्याणाचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘शांती संदेश धम्मयात्रा २०२६’चे भद्रावती शहरात उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. या आंतरराष्ट्रीय धम्मयात्रेत थायलंड देशातील सुमारे ११० भिक्खू सहभागी झाले होते. त्यांच्या उपस्थितीमुळे भद्रावतीच्या ऐतिहासिक विज्जासन बुद्ध लेणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
५ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता चंद्रपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमीतून धम्मयात्रेला प्रारंभ झाला. ऊर्जाग्राम (ताडाळी) येथे भोजन व विश्रांतीनंतर ताडाळी पुलापासून पदयात्रेला पुन्हा सुरुवात झाली. सुमठाणा येथील ऑर्डनन्स फॅक्टरी बुद्ध विहार व सम्राट अशोक चौक येथे धम्मयात्रेचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर चंद्रपूर-नागपूर मुख्य मार्गाने ही पदयात्रा भद्रावतीकडे मार्गस्थ झाली.
भद्रावती शहरात दाखल झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार परिसरातून धम्मयात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी भदंत ज्ञानज्योती आणि त्यांच्या भिक्खू संघानेही धम्मयात्रेत सहभाग नोंदविला. शहरातील विविध चौकांमध्ये धम्मबांधव, उपासक-उपासिका आणि नागरिकांनी पुष्पवृष्टी व बुद्ध वंदनेच्या जयघोषात भिक्खू संघाचे स्वागत केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात माल्यार्पणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर धम्मयात्रा ऐतिहासिक विज्जासन बुद्ध लेणी येथे पोहोचली.
लेणी परिसरात भिक्खू संघाच्या उपस्थितीत धम्मदेशना व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ६ नोव्हेंबर रोजी सकाळी भिक्खू संघाची चारिका (पिंडपात) पार पडली. त्यानंतर धम्मयात्रेने संभाजीनगर (औरंगाबाद)कडे प्रस्थान केले.
या धम्मयात्रेचे आयोजन विज्जासन बुद्ध लेणी वर्षावास समिती, सम्राट अशोक वाचनालय, धम्मचक्र अनुवर्तन दिन सोहळा समिती, डॉ. आंबेडकर जयंती उत्सव समिती, जयभीम पंचविज्ञान, डॉ. आंबेडकर युथ क्लब, संविधान नागरिक संवर्धन कृती समिती तसेच भद्रावती शहरातील सर्व बुद्ध विहार समित्यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
भगवान बुद्धांचा शांती, समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश समाजात रुजविणारी ही धम्मयात्रा भद्रावतीच्या बौद्ध सांस्कृतिक व ऐतिहासिक परंपरेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आणि संस्मरणीय ठरली.


