कोठारी पोलिसांची अवैद्य दारू वाहतुकीवर कारवाई ; १६.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त
३९ पेट्या देशी दारुसह १५ लाखांचा ट्रक जप्त ; ट्रकचालक फरार
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ अवैध दारू वाहतुकीविरोधात चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी धडक कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशन कोठारी यांच्या संयुक्त पथकाने बल्लारशाह-कोठारी मार्गावरील सातबारा हॉटेलजवळ नाकाबंदी करून देशी दारूच्या ३९ पेट्या आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक जप्त केला. या कारवाईत एकूण १६ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला.
*गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई*
दि. ६ नोव्हेंबर २०२६ रोजी कोठारी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी बल्लारशाह-कोठारी मार्गावरील सातबारा हॉटेलजवळ नाकाबंदी केली होती. यावेळी संशयित ट्रक चालकाने पोलिसांना पाहून ट्रक न थांबवता पळ काढण्याचा प्रयत्न केला. काही अंतरावर ट्रक सोडून चालक फरार झाला.
*३९ पेट्या देशी दारू जप्त*
पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये देशी दारूच्या ३९ पेट्या आढळून आल्या. त्यामध्ये एकूण ३ हजार ९०० नग दारूच्या बाटल्या असल्याची नोंद आहे. जप्त दारूची किंमत १ लाख ५६ हजार रुपये असून, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या एम एच ३४ ए बी ५५९२ क्रमांकाच्या ट्रकची किंमत १५ लाख रुपये आहे. अशा प्रकारे एकूण १६ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
*ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल*
या प्रकरणी फरार ट्रकचालकाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५ (अ) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १७९(१) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई उपविभाग राजुरा पथक आणि पोलीस स्टेशन कोठारी यांच्या संयुक्त पथकाने केली. अवैध दारू वाहतुकीविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.



