दिन विशेष – ९ नोव्हेंबर – राष्ट्रीय विधी सेवा दिन
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे उपक्रम जनहिताचे आहेत _ मुख्य लोक अभिरक्षक अॅड विनोद बोरसे यांची माहिती

चांदा ब्लास्ट
विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यात जनसहभागाची आवश्यकता ; समाजातील दुर्बल घटकांना मोफत विधी सहाय्य पुरविण्याचे कार्य महत्त्वाचे आहे.
चंद्रपूर :_ न्यायापासुन कुणीही वंचित राहू नये,गरजुंना मोफत विधी सेवा उपलब्ध व्हावी यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण कार्यरत आहे. विधी सेवा प्राधिकरणाचे उपक्रम जनहिताचे असुन समाजातील दुर्बल घटकांना मोफत विधी सहाय्य पुरविण्याकामी आणखी मोठ्या प्रमाणात जनसहभागाची आवश्यकता आहे.जनतेने स्वयंस्फूर्तीने अशा उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवुन विधी सेवा प्राधिकरणाकडील योजनांचा फायदा घेणे गरजेचे असल्याचे मत चंद्रपूर जिल्हा न्यायालयातील विधी सेवा प्राधिकरणाच्या अंतर्गत असलेल्या लोक अभिरक्षक कार्यालयाचे मुख्य लोक अभिरक्षक अॅड विनोद बोरसे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केले.
राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त संवाद साधताना अॅड विनोद बोरसे यांनी विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्याची माहिती दिली.
काय आहे राष्ट्रीय विधी सेवा दिन ?
समाजातील गरीब, दुर्बल आणि वंचित घटकांना मोफत व सक्षम विधी सेवा उपलब्ध करून देणेसाठी सन १९८७ मध्ये विधी सेवा प्राधिकरण कायदा मंजूर झाला आहे या कायद्याची अंमलबजावणी दि.९ नोव्हेंबर १९९५ पासून झाली.त्यामुळे दि.९ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय विधी सेवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
असे आहे कार्य !
विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून गरजू लोकांना मोफत विधी सेवा व सहाय्य पुरविण्याचे कामासह लोक न्यायालयाचे आयोजन करणे, वैवाहिक वाद मध्यस्थ आणि समेट पध्दतीने मिटविणे , कायदे विषयक शिबिराचे आयोजन करणे तसेच कैद्यांना व न्यायाधीन बंद्यांना मोफत विधी सेवा पुरविणे, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाकडील विविध योजनांची माहिती सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविणे आदी प्रकाराची कामे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून होत असतात.
मोफत विधी सेवा!
न्यायालयीन सुनावणीसाठी वकीलांचे शुल्क भरू न शकणाऱ्या नागरिकांना मोफत विधी सेवा पुरविण्यात येते.अटकेतील व्यक्ती,तुरुंगातील कैदी,महिला, लहान मुले,अनुसूचित जाती व जमातीचे सदस्य, मानसिक आजारी किंवा शारीरिकदृष्ट्या दिव्यांग व अक्षम असलेली व्यक्ती, अवैध मानवी व्यवसायातील बळी, सामुहिक आपत्ती, वांशिक हिंसाचार, जातीय अत्याचार,पुर, दुष्काळ,भुकंप, औद्योगिक आपत्तीचे बळी, औद्योगिक कामगार, वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा कमी असलेल्या व्यक्तींना मोफत विधी सेवा पुरविण्यात येते.
लोक अभिरक्षक कार्यालयाचे कार्य!
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अंतर्गत असलेल्या लोक अभिरक्षक कार्यालयाचे माध्यमातून जिल्हा कारागृहात भेट दिली जात असते. तुरुंगातील कैदी आणि न्यायाधीन बंद्यांना कारागृह विधी सेवा चिकित्सालयात मोफत विधी सेवा व सहाय्य पुरविले जाते.दैनंदिन न्यायालयीन कामकाजात गरजुंना मोफत कायदेशीर सल्ला दिला जातो तसेच मोफत विधी सेवा व सहाय्य पुरविले जाते. दैनंदिन व सुटीच्या दिवशी रिमांड कामाच्या वेळी गरजूंना मोफत विधी सेवा पुरविली जाते.
लोक अभिरक्षक कार्यालयाची कामाची आकडेवारी!
( दि.१नोव्हेंबर २०२६ ते ३१ आॅक्टोबर २०२६ या कालावधीत )
रिमांडची कामे – १६१
जामीन अर्ज निकाली – ११४
साक्षीदार तपासले – २११
प्रकरणे निकाली – ६७
कार्यालयात गरजुंना दिलेला मोफत सल्ला – १२८
कारागृह विधी सेवा चिकित्सालयात न्यायबंदींना दिलेला मोफत सल्ला – १७४८
कारागृहाला दिलेल्या भेटी – १६८
वरील प्रमाणेचे काम गेल्या वर्षभरात लोक अभिरक्षक कार्यालयाचे माध्यमातून करण्यात आले आहे.
मौलीक प्रशासकीय मार्गदर्शन!
चंद्रपूर जिल्हा न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री अभय लाहोटी व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर श्री सुधीर इंगळे यांच्या प्रशासकीय मार्गदर्शनाखाली लोक अभिरक्षक कार्यालयाचे काम चालत असुन मुख्य लोक अभिरक्षक म्हणून अॅड विनोद बोरसे,तर सहाय्यक लोक अभिरक्षक म्हणून अॅड अनुपमा फलके आणि अॅड साकीया शेख सध्या कार्यरत आहेत.
समाजातील वंचित आणि गरजू लोकांनी विधी सेवा प्राधिकरणाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य लोक अभिरक्षक अॅड विनोद बोरसे यांनी राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त केले आहे.


