ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘पंढरीची वारी’ने रंगली ‘दिवाळी पहाट’ 

रोटरी क्लब आणि सिम्फनी क्लबचा सांस्कृतिक सोहळा; साक्षात विठ्ठल रूखुमाईची भक्तिमय अनुभूती 

 चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ दिवाळीचा मंगलमय उत्साह, पहाटेच्या प्रसन्न वातावरणात घुमणारे सुरेल स्वर आणि विठ्ठलनामाचा गजर… अशा भक्तिमय व सांस्कृतिक वातावरणात रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर तथा आयएफआरएम सिम्फनी क्लबच्या वतीने आयोजित सातवा ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. दाताळा रोडवरील बोराडे प्राइम बँक्वेट हॉल येथे शनिवारी (७ नोव्हेंबर) सकाळी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या कार्यक्रमाची ‘पंढरीची वारी’ ही संकल्पना विशेष आकर्षण ठरली.

कार्यक्रमात भक्तिगीते, भावगीते, लोकप्रिय मराठी-हिंदी गाणी, पारंपरिक नृत्य आणि वारीनृत्य अशा विविध कलाविष्कारांची सुरेल मेजवानी रसिकांना अनुभवता आली.

कार्यक्रमाची सुरुवात ‘एकदंताय वक्रतुंडाय’ या गणेश स्तोत्राने झाली. डॉ. आसावरी देवतळे यांनी ‘दर्शन दे रे दे रे भगवंता’, राजेश गण्यारपवार यांनी ‘विठू माऊली जगाची’, तर अविनाश उत्तरवार यांनी ‘देहाची तिजोरी’ सादर करून भक्तिरसाची उधळण केली. ‘रखुमाई… रखुमाई…’ या नृत्याविष्काराने वारीचा उत्साह जागविला.

यावेळी हौशी बालकलावंत चार्वी सुरज वाघ ही रखुमाई तर त्रिधा सुनील मल्लोजवार विठ्ठलाच्या वेषभूषेत सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.अनया आणि अनिशा भारत यांनी ‘मेरे घर राम आये हैं’ या गीतावर सादरीकरण केले. पल्लवी चंदावार यांचे ‘दिस चार झाले मन’, डॉ. मल्लोजवार यांचे ‘मन उधाण वाऱ्याचे’, मनीष बोराडे यांचे ‘पाहिले न मी तुला’, उत्तम डाखरे यांचे ‘माँ बम्लेश्वरी’, वृषाली डेकाटे यांचे ‘रुके रुके से कदम’ आणि सचिन गंगरेडीवार यांचे ‘नाम गुम जायेगा’ या गीतांनी कार्यक्रमात रंगत आणली. डॉ. राम भारत यांच्या मनाच्या धुंदीत, डॉ. सिमला गजरलावार यांच्याा आगे भी जाने ना तू आणि मनीषा पडगिलवार यांच्या लावणी सादरीकरणालाही दाद मिळाली. वेदांत गण्यारपवार व समुहाच्या ‘गोरा कुंभार’ या नाट्याविष्काराने कार्यक्रमात वेगळी रंगत भरली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अल्का ठाकरे यांनी केले. रोटरी क्लब अध्यक्ष स्मिता जीवतोडे, सचिव विशाल खांडरे, प्रकल्प निर्देशक मनिषा पडगिलवार, वृषाली डेकाटे, सहप्रकल्प निर्देशक मनिष बोराडे, डॉ. अल्का ठाकरे, उत्तम डाखरे, संतोष तेलंग, राजेश गण्यारपवार, पल्लवी चंदावार यांच्यासह सर्व सदस्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. दिवाळीचा आनंद, संगीताची मैफल आणि भक्तिभाव यांचा सुंदर संगम साधणारा हा सोहळा उपस्थितांसाठी संस्मरणीय ठरला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घेतला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये