ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

टॉवर उभारले; मात्र शेतकऱ्यांच्या मोबदल्याचा प्रश्न अधांतरी!

४०० केव्ही व २२० केव्ही वीजवाहिन्यांच्या कामाला वेग ; शेतकऱ्यांमध्ये नाराजी, योग्य मोबदल्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी तालुक्यातील विविध भागांतून जाणाऱ्या उच्चदाब वीजवाहिन्यांसाठी टॉवर उभारणीचे काम सुरू असताना संबंधित शेतकऱ्यांना जमिनीचा व पिकांचा योग्य मोबदला मिळत नसल्याची तक्रार पुढे आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ४०० केव्ही तसेच २२० केव्ही क्षमतेच्या टॉवर लाईनच्या कामामुळे अनेक शेतजमिनी बाधित होत असून, मोबदल्याबाबत शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

गेल्या काही काळापासून तालुक्यातील काही भागात टॉवर लाईनचे काम सुरू आहे. या कामासाठी शेतजमिनीचा वापर होत असताना जमिनीचे नुकसान, उभ्या पिकांचे नुकसान तसेच टॉवर उभारणीमुळे भविष्यातील शेतीच्या वापरावर होणारा परिणाम याचा योग्य पद्धतीने विचार करून भरपाई देणे अपेक्षित आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांना अद्याप अपेक्षित मोबदला मिळालेला नसल्याचा दावा सूत्रांकडून करण्यात येत आहे.

तारसा, विठ्ठलवाडा, राळापेठ, तारडा, घडोली, भनारहेटी, लिखितवाडा, वढोली परिसरासह विविध गावांतील शेतकरी या वीजवाहिनी प्रकल्पामुळे प्रभावित होत असल्याचे सांगितले जात आहे. काही ठिकाणी टॉवर उभारणीचे काम सुरू असून, मोबदल्याबाबत स्पष्टता नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि असंतोष वाढत आहे.

दरम्यान, संबंधित शेतकऱ्यांना प्रकल्पाची माहिती, टॉवर लाईनचा मार्ग, बाधित क्षेत्र, पंचनामे आणि मोबदल्याची प्रक्रिया याबाबत स्पष्ट माहिती देण्याची मागणी होत आहे. शेतकऱ्यांच्या संमती व हक्कांचा विचार न करता काम पुढे नेले जात असल्यास त्याला विरोध केला जाईल, अशी भूमिका काही शेतकऱ्यांनी घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

*मोबदल्याबाबत पारदर्शकता आवश्यक*
टॉवर लाईनच्या कामामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीवर कायमस्वरूपी परिणाम होत असल्याने नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याचे स्वतंत्र पंचनामे करून नियमानुसार योग्य मोबदला निश्चित करावा, अशी मागणी पुढे येत आहे. तसेच यापूर्वी झालेल्या नुकसानीचीही पाहणी करून प्रलंबित भरपाई तातडीने देण्याची मागणी होत आहे.

*शेतकऱ्यांची जमीन_ प्रकल्पाचा विकास*
वीज प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर होत असेल तर प्रकल्पाचा विकास आणि शेतकऱ्यांचे हक्क यामध्ये समतोल राखणे गरजेचे आहे. त्यामुळे संबंधित वीज विभाग व प्रशासनाने याप्रकरणी तातडीने बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण करावे, अशी मागणी होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये