ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

औषध फवारणीबाबत प्र. तालुका कृषी अधिकारी गणेश गवळी यांचे मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पोंभुर्णा : तालुक्यातील वातावरणातील बदल आणि वाढलेल्या दमटपणामुळे धान पिकावर कडा करपा (जीवाणूजन्य रोग) व खोडकीडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर प्र. तालुका कृषी अधिकारी गणेश गवळी यांनी आष्टा, चेक पोंभुर्णा, पोंभुर्णा, बोर्डा बोरकर, देवाडा खुर्द आणि चिंतलधाबा येथील शेतांमध्ये प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली.

पाहणीदरम्यान त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत पिकांची सद्यस्थिती जाणून घेतली आणि रोग व कीड नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजनांचे तांत्रिक मार्गदर्शन केले.

गणेश गवळी यांनी सांगितले की, सध्याच्या दमट वातावरणात धानावर कडा करपा आणि खोडकीडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे रोगाची सुरुवातीची लक्षणे दिसताच योग्य औषधांची वेळेवर फवारणी करणे आवश्यक आहे.

कडा करपा रोगाची लक्षणे व उपाय

कडा करपा रोगात पानांच्या कडांवर तपकिरी लांबट डाग पडणे, पाने पिवळी पडणे व सुकण्यास सुरुवात होते.

शिफारस केलेली फवारणी (प्रति 100 लिटर पाणी):

कॉपर ऑक्सिक्लोराईड 50% एसपी – 25 ग्रॅम

स्ट्रेप्टोसायक्लीन – 6 ग्रॅम

खोडकीडीवरील उपाय

धान फुटवे अवस्थेत असताना खोडकीड खोडात छिद्रे करून रोपे कोमेजवते.

शिफारस केलेली फवारणी:

कार्टाप हायड्रोक्लोराईड 50% एसपी – 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी, किंवा

फिप्रोनिल 5% एससी – 30 मिली प्रति 15 लिटर पाणी.

फवारणी करताना औषध धानाच्या बुडा पर्यंत पोहोचेल याची काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

सुरक्षिततेचे आवाहन

रासायनिक औषधांची फवारणी करताना शेतकऱ्यांनी संरक्षक पोशाख, हातमोजे आणि तोंडाला मास्क वापरावा तसेच सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्र. तालुका कृषी अधिकारी गणेश गवळी यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये