ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जागतिक बांबू दिनानिमित्त एकदिवसीय कार्यशाळा

रोजगार,उत्पन्नवाढीसह पर्यावरण संवर्धनावर भर ; सावली वनपरिक्षेत्राचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

ग्रामीण भागातील शेतकरी व ग्रामसभांना बांबू लागवडीच्या माध्यमातून रोजगार आणि उत्पन्नाचे नवे साधन उपलब्ध करून देण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाला चालना देण्याच्या उद्देशाने सावली वनपरिक्षेत्रात जागतिक बांबू दिनानिमित्त १८ सप्टेंबर रोजी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

सावली वनपरिक्षेत्र व बायोटेक ग्रीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेत सामूहिक वनहक्क समितीचे पदाधिकारी, सरपंच, शेतकरी, पंचायत समितीअंतर्गत कर्मचारी तसेच वन विभागातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार प्रांजली चिरडे होत्या, तर गटविकास अधिकारी मुक्तेश्वर कोमलवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. बांबूटेक ग्रीन सर्व्हिसेसच्या संचालिका अन्नपूर्णा धुर्वे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बांबू लागवडीसंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी तालुका कृषी अधिकारी ललित राऊत व वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती.

*लागवडीपासून मार्केटिंगपर्यंत मार्गदर्शन*

कार्यशाळेत बांबूच्या योग्य प्रजातींची निवड, लागवड तंत्रज्ञान, व्यवस्थापन, निंदणी, हार्वेस्टिंग, बाजारपेठ, तसेच बांबूपासून हस्तकला वस्तू तयार करून अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

बांबू हा वेगाने वाढणारा आणि कार्बन शोषण करणारा वनस्पतीप्रकार असल्याने त्याच्या लागवडीमुळे जल व मृदसंधारणासोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे ग्रामसभा व गावांच्या शाश्वत विकासासाठी बांबू लागवड प्रभावी माध्यम ठरू शकते, यावर कार्यशाळेत भर देण्यात आला.

*रोजगारासाठी होणारी भटकंती कमी होण्याची आशा*

“बांबू लागवड, त्याचे योग्य व्यवस्थापन आणि बाजारपेठेशी जोडणी झाली तर ग्रामीण भागातील नागरिकांना स्थानिक पातळीवर रोजगार व उत्पन्नाचे साधन उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे सावली तालुक्यातील मजुरांची रोजगारासाठी होणारी भटकंती कमी होण्यास मदत होईल,” असा विश्वास वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांनी प्रास्ताविकातून व्यक्त केला.

या कार्यशाळेत मिळालेल्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे सामूहिक वनहक्क समितीचे पदाधिकारी, सरपंच व शेतकऱ्यांमध्ये बांबू लागवडीबाबत आत्मविश्वास निर्माण झाला असून, सावली तालुक्यात भविष्यात बांबू लागवडीला अधिक चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक विनोद धुर्वे वनपारिक्षेत्र अधिकारी सावली, सूत्रसंचालन राजू मुरकुटे वनरक्षक चकपीरंजी यांनी केले तर आभार V. B. G. रामजी विभागाचे भोयर यांनी मानले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये