राजुरा न्यायालयासमोरील हत्या प्रकरणात ‘त्या’ आरोपीला पाच दिवस पोलीस कोठडी
लोक अभिरक्षक कार्यालयाने पुरविली मोफत विधी सेवा

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ राजुरा न्यायालयासमोरील टपरीवर बसलेल्या एका तरुणावर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला.याप्राणघातक हल्ल्यात डोक्यात आणि छातीत गोळ्या लागल्याने विनोद ऊर्फ पापा जाधव राहणार सोमनाथपुर वाॅर्ड, राजुरा जिल्हा चंद्रपूर यांचा मृत्यू झाला होता.त्या प्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झालेली आहे.या गुन्हयाकामी दि.१९ सप्टेंबर रोजी शनिवारी चंद्रपूर जिल्हा न्यायालयातील विशेष मकोका न्यायालयात अटकेतील आरोपी अंकीत ऊर्फ भल्लासेठ मासीरकर वय २४ वर्षे धंदा. शेती राहणार चुनाळा तालुका राजुरा जिल्हा चंद्रपूर यास राजुरा पोलीसांनी रिमांडकामाकरीता हजर केले होते.
त्यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अंतर्गत असलेल्या लोक अभिरक्षक कार्यालयाने आरोपीला मोफत विधी सेवा पुरविली.लोक अभिरक्षक कार्यालयाचे मुख्य लोक अभिरक्षक अॅड विनोद बोरसे यांनी आरोपीच्या वतीने न्यायालयात वकील पत्र सादर केले.
पोलीसांनी आरोपीची पोलीस कोठडी मिळावी असा रिपोर्ट न्यायालयात सादर केला.आरोपीच्यावतीने अॅड विनोद बोरसे यांनी युक्तिवाद करून पोलीस कोठडी मिळणेच्या विनंतीला विरोध केला.गुन्हयाचे गांभीर्य पाहून आणि पोलीसांना तपासाची संधी मिळावी यासाठी विशेष मकोका न्यायालयाने आरोपीला पाच दिवस म्हणजेच दिनांक २३ सप्टेंबर बुधवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.विशेष मकोका न्यायालयात आरोपीची बाजू अॅड विनोद बोरसे मांडत आहेत.



