मासळ येथे रंगली ‘सुरेल संगीत मैफिल’
अभिजात संगीताच्या स्वरांनी रसिक मंत्रमुग्ध : ग्रामीण भागातील संगीतप्रेमींची उत्स्फूर्त उपस्थिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
ग्रामीण भागातील संगीतप्रेमींना अभिजात व शास्त्रीय संगीताचा आनंद घेता यावा, या उद्देशाने नादब्रह्म संगीत विद्यालय, भद्रावती यांच्या वतीने गुरुवार, दि. १७ सप्टेंबर रोजी मासळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात ‘सुरेल संगीत मैफिल’चे आयोजन करण्यात आले. नामवंत कलाकारांच्या सुमधुर गायन व तालवादनाने संपूर्ण परिसर सुरेल स्वरांनी भारावून गेला.
या मैफिलीमध्ये आळंदी (पुणे) येथील संगीत अलंकार गुरुवर्य निवृत्ती धाबेकर यांनी आपल्या शास्त्रीय गायनाने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या गायनाला पुणे येथील सुप्रसिद्ध तबलावादक पांडुरंगजी पवार यांनी प्रभावी तबलासाथ देत मैफिलीची रंगत वाढविली.
गायन आणि तबल्याच्या सुरेल मिलाफातून सादर झालेल्या कलाविष्काराला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. शहरांमध्ये सहज उपलब्ध होणारे अभिजात संगीत ग्रामीण भागातील रसिकांपर्यंत पोहोचावे, तसेच नव्या पिढीमध्ये शास्त्रीय संगीताची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मैफिलीला मासळ परिसरातील नागरिक व संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कलाकारांच्या सादरीकरणाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हरीश घुमे, बबनजी ठक, अर्हत पाझारे, सचिन बावने तसेच मित्र परिवाराने परिश्रम घेतले. कार्यक्रमाला नादब्रह्म साऊंड सर्व्हिस, भद्रावती यांचे सौजन्य लाभले.



