अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई
ट्रॅक्टरसह ४ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंढा नाला येथून विनापरवाना रेती चोरी करून तिची वाहतूक करणाऱ्या वाहनावर भद्रावती पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत अवैध रेतीसह महिंद्रा सरपंच ट्रॅक्टर व ट्रॉली असा एकूण ४ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भद्रावती पोलीस ठाण्याचे पथक २० सप्टेंबर रोजी हद्दीत गस्त घालत असताना कोंढा नाला येथून अवैधरीत्या चोरी केलेली रेती ट्रॅक्टरमध्ये भरून भद्रावतीच्या दिशेने आणली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कोंढा फाटा ते भद्रावती मार्गावर नाकाबंदी केली. पहाटे सुमारे ५.३० वाजता कोंढा फाट्याकडून येणारा ट्रॅक्टर अडवून पंचांसमक्ष तपासणी केली असता त्याच्या ट्रॉलीमध्ये रेती आढळून आली.
चौकशीदरम्यान चालकाकडे रेती वाहतुकीसाठी आवश्यक शासकीय परवाना अथवा रॉयल्टी आढळून आली नाही. चालकाने सदर रेती कोंढा नाल्यातून चोरी करून आणल्याचे तसेच ट्रॅक्टर मालक रुपेश नामदेव उरकुडे यांच्या सांगण्यावरून रेती भरल्याचे पोलिसांना सांगितले.
या प्रकरणी प्रजित सुभाष चामनकर (वय २८, रा. मांगली, ता. भद्रावती) आणि रुपेश नामदेव उरकुडे (रा. सुमठाणा, भद्रावती) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये अंदाजे ४ लाख रुपये किमतीचा महिंद्रा सरपंच ट्रॅक्टर, ५० हजार रुपये किमतीची ट्रॉली आणि सुमारे ६ हजार रुपये किमतीची एक ब्रास अवैध रेतीचा समावेश आहे.
याप्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात बीएनएस कलम ३०३(२), महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८(७), ४८(८) तसेच मोटार वाहन कायदा १९८८/१९८९ मधील कलम ५०/१७७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई परि. पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष केदार, प्रशांत शेंदरे, देवानंद डुकरे, गोपाल आतकुलवार यांच्या पथकाने केली.



