ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चिखल काढायला उतरले अन् गाव बदलण्याचा संकल्प केला!

६० आठवड्यांपासून सांगोड्यात ‘एक दिवस गावासाठी’ची अखंड चळवळ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

रस्त्यावर साचलेले पाणी आणि त्यात माखलेला चिखल… नागरिकांची ये-जा सुरू होती; मात्र चिखलाचा त्रास सहन करावा लागत होता. कुठे पाय घसरत होते, तर कुठे रस्त्याच्या कडेला साचलेल्या चिखलामुळे मार्गच अरुंद झाला होता. ही परिस्थिती पाहून काही युवक मित्र स्वस्थ बसले नाहीत. हातात साधने घेत त्यांनी थेट चिखलात उतरून रस्ता मोकळा करण्यास सुरुवात केली.

कोणताही गाजावाजा नाही, कुठलीही अपेक्षा नाही… काही युवकांनी एकत्र येत चिखल बाजूला केला आणि नागरिकांसाठी रस्ता सुकर केला. काम संपल्यानंतर मात्र त्यांच्या चर्चेतून एक वेगळीच कल्पना पुढे आली—‘आज चिखल काढला; पण गावाच्या प्रश्नांसाठी आपण दर रविवारी काही तास दिले तर?’

याच विचारातून ‘एक दिवस गावासाठी’ या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्या दिवशी चिखलात उतरलेले काही हात आज तब्बल ६० आठवड्यांपासून गावाच्या स्वच्छतेसाठी नियमितपणे झटत आहेत.

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामस्वच्छता व ग्रामविकासाच्या विचारांनी प्रेरित होऊन युवकांनी ‘वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम सेवा संघ’ स्थापन केला. या संघाच्या माध्यमातून दर रविवारी ‘एक दिवस गावासाठी’ हा उपक्रम नित्यनेमाने राबविला जात आहे.

रविवारची सुट्टी नाही; १५ ते २० युवकांचे श्रमदान

दर रविवारी साधारण १५ ते २० युवक एकत्र येऊन गावातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि कचरा साचणाऱ्या परिसराची स्वच्छता करतात. नाल्यांची सफाई, कचरा संकलन, वृक्षारोपण व झाडांचे संगोपन यासोबतच कचरा साचणाऱ्या ठिकाणी कचराकुंड्यांची व्यवस्था करण्यावरही भर दिला जात आहे.

युवकांच्या श्रमाला गावकऱ्यांची साथ

सुरुवातीला युवकांपुरता असलेला हा उपक्रम आता लोकसहभागाची चळवळ बनला आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत नागरिक, तसेच काही महिलाही स्वच्छता मोहिमेत सहभागी होत आहेत. त्यामुळे ‘एक दिवस गावासाठी’ ही संकल्पना आता सांगोड्याच्या सामाजिक जीवनाचा एक भाग बनली आहे.

तालुक्यासाठी ठरतोय आदर्श

तालुक्यात अशा स्वरूपाचे उपक्रम काही ठिकाणी सुरू झाले; मात्र कालांतराने त्यात सातत्य राहिले नाही. सांगोड्यात मात्र ६० आठवडे एकही खंड न पडता ही चळवळ सुरू आहे. त्यामुळे ‘एक दिवस गावासाठी’ हा उपक्रम आता केवळ सांगोड्यापुरता मर्यादित न राहता इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

ज्या चिखलातून युवकांनी एक दिवस रस्ता मोकळा केला, त्याच चिखलातून ‘गावासाठी काहीतरी करण्याची’ विचारधारा जन्माला आली. आज त्या विचारधारेने ६० आठवड्यांचा टप्पा गाठला आहे. सांगोड्यातील युवकांनी दाखवून दिले आहे की, बदलासाठी मोठ्या घोषणा नव्हे, तर दर आठवड्याला पुढे येणारे काही हात पुरेसे असतात

(“आठवड्यातील एक दिवस गावासाठी” हा केवळ स्वच्छता उपक्रम नसून गावाच्या विकासाची चळवळ आहे. दर रविवारी युवक एकत्र येऊन रस्ते, नाल्या व कचराकुंड्यांची स्वच्छता करतात. स्वच्छता ही केवळ ग्रामपंचायतीची जबाबदारी नसून प्रत्येक गावकऱ्याची जबाबदारी आहे. प्रत्येकाने आपल्या गावासाठी थोडा वेळ दिला, तर गाव नक्कीच स्वच्छ, सुंदर आणि निरोगी होईल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामसेवेच्या विचारातून सुरू झालेली ही चळवळ भविष्यात मोठ्या जनचळवळीत रूपांतरित व्हावी, हीच अपेक्षा.” :- शुभम ढवस ग्राम सेवा संघ, सांगोडा)

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये