रक्तदानातून मानवतेचा संदेश!
१०१ नागरिकांचे उत्स्फूर्त रक्तदान
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
नांदा : जय बजरंग गणेश मंडळ, नांदा यांच्या वतीने ४५ व्या गणेशोत्सवानिमित्त रविवार, दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी महात्मा गांधी चौक, वॉर्ड नं. ०३, नांदा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, तब्बल १०१ नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श निर्माण केला.
रक्तदान हेच श्रेष्ठ दान या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचा उद्देश गरजू रुग्णांना मदत करणे आणि समाजामध्ये रक्तदानाविषयी जनजागृती निर्माण करणे हा होता. गणेशोत्सवाच्या आनंदाला सामाजिक बांधिलकीची जोड देत मंडळाने राबविलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.
या रक्तदान शिबिरासाठी गडचिरोली ब्लड बँक, गडचिरोली यांचे सहकार्य लाभले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, नांदा येथील वैद्यकीय पथकाने आरोग्यविषयक सहकार्य केले.
रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याने समाजाप्रती आपली जबाबदारी जपत मानवतेच्या सेवेत मोलाचे योगदान दिले. अशा सामाजिक उपक्रमांमुळे रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित होते.
जय बजरंग गणेश मंडळ, नांदा यांच्या वतीने शिबिरात सहभागी झालेल्या सर्व १०१ रक्तदात्यांचे, गडचिरोली ब्लड बँकेच्या पथकाचे, प्राथमिक आरोग्य केंद्र नांदा येथील वैद्यकीय पथकाचे तसेच सहकार्य करणाऱ्या सर्व नागरिकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमांसोबतच समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची परंपरा कायम ठेवत जय बजरंग गणेश मंडळाने सामाजिक सेवेत आपले योगदान दिले.



