घुग्घुसमध्ये सर्वधर्मीय महाआरतीने दिला सामाजिक एकतेचा संदेश
गणेश आरतीत हिंदू-मुस्लिम-शिख-इसाई-बौद्ध बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग; ‘विविधतेत एकता’चा जागर

चांदा ब्लास्ट
घुग्घुस/चंद्रपूर : श्रद्धा, सौहार्द, बंधुभाव आणि सामाजिक एकतेचा अनोखा संदेश देणाऱ्या सर्वधर्मीय महाआरतीचे आयोजन घुग्घुस येथे जय श्रीराम गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आले. गणेश आरती आणि पूजेच्या या धार्मिक सोहळ्यात हिंदू, मुस्लिम, शिख, इसाई आणि बौद्ध समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत एकत्रितपणे महाआरती केली.
विविध धर्मांचे नागरिक एकाच ठिकाणी श्रद्धेने एकत्र येऊन गणरायाची आरती करताना दिसल्याने या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. धर्म वेगवेगळे असले तरी मानवता, बंधुभाव आणि राष्ट्रभावना एकच आहे, असा सकारात्मक संदेश या माध्यमातून देण्यात आला.
या प्रसंगी आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, घुग्घुस ही विविध धर्म, जाती आणि भाषेच्या नागरिकांची भूमी आहे. प्रत्येक समाज आपापल्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरा जपत एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होतो, हीच घुग्घुसच्या सामाजिक जीवनाची खरी ओळख आहे. सर्वधर्मीय महाआरतीसारख्या उपक्रमांमुळे परस्परांमधील प्रेम, विश्वास आणि बंधुभाव अधिक दृढ होतो. श्रद्धा वेगवेगळी असली तरी मानवता आणि राष्ट्रभावना एकच असल्याचे त्यांनी सांगितले.
दहा वर्षांपूर्वी सुरू झालेली परंपरा
राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे म्हणाले की, सुमारे दहा वर्षांपूर्वी सर्वधर्मीय महाआरतीची सुरुवात करण्यात आली. त्यावेळी सर्व धर्मांच्या नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आज हा कार्यक्रम दिवसेंदिवस अधिक व्यापक स्वरूप धारण करत असून महाराष्ट्रातील प्रसिद्ध वृत्तवाहिन्याही या उपक्रमाची दखल घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्वधर्मीय नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
जय श्रीराम गणेश मंडळाच्या वतीने आयोजित महाआरतीत विविध समाजांच्या प्रतिनिधींनी एकत्रित सहभाग घेतला.
मुस्लिम समाजाच्या वतीने हसन शेख, खलील अहमद, मोमीन शेख, इम्तियाज रज्जाक, इर्शाद कुरेशी, नईम खान, मुज्जू लोहाणी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
इसाई समाजाच्या वतीने पा. नेमीया नगराळे, निरीक्षण तांड्रा, अशोक अटकूर, लच्छय्या मंत्रिवार, उदय आरमुल्ला यांनी सहभाग नोंदविला.
शिख समाजाच्या वतीने जतींदरसिंग दारी, रत्नेश सिंग, गुरुजीतसिंग कलजीत, दिपक अनेजा आणि विशाल नंदवानी सहभागी झाले.
बौद्ध समाजाच्या वतीने हेमंत पाझारे, दिलीप रामटेके, राहुल टिपले आणि अतुल चोखांद्रे उपस्थित होते.
तर हिंदू समाजाच्या वतीने प्रेमलाल पारधी, मधुकर मालेकर, संजय भोंगळे, जनाबाई निमकर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांनी महाआरतीत सहभाग घेतला.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री तथा घुग्घुस नगरपरिषद नगरसेवक विवेक बोढे, जिल्हा भाजयुमो महामंत्री अमोल थेंरे, प्रयास सखी मंचच्या मुख्य मार्गदर्शिका अर्चना भोंगळे, अध्यक्षा किरण बोढे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच भाजपा व्यापारी आघाडीचे जिल्हा सहसंयोजक विनोद चौधरी, माजी जिल्हा परिषद सभापती नितु चौधरी, नगरसेविका वैशाली ढवस, चिन्ना नलभोगा, धनराज पारखी, सुरेंद्र भोंगळे, तुलसीदास ढवस, सुरेंद्र जोगी यांच्यासह विविध समाजातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘विविधतेत एकता’चा संदेश
गणेश आरती, पूजा आणि महाआरतीच्या निमित्ताने घुग्घुसमध्ये सामाजिक सलोखा, परस्पर सन्मान आणि एकोप्याचे वातावरण पाहायला मिळाले. विविध धर्मांचे नागरिक एकत्र येऊन धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्याने उपस्थितांमध्येही उत्साहाचे वातावरण होते.
‘विविधतेत एकता’ आणि ‘सर्वधर्म समभाव’ या मूल्यांचा संदेश देणारा हा उपक्रम घुग्घुसच्या सामाजिक ऐक्याचे एक सकारात्मक उदाहरण ठरल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.



