ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गुणवंत विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाची उंच भरारी घ्यावी

विधीमंडळ काॅंग्रेस पक्षनेते, आ.विजय वडेट्टीवार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी :- विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात ध्येय निश्चित करून मेहनत, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या बळावर यशाची उंच भरारी घ्यावी. शिक्षणासोबतच कौशल्य विकासावर भर देत विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवावा, असे प्रतिपादन विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते, आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.

‘ब्रम्हपुरीचा महाराजा गणेश उत्सव समिती’च्या वतीने गणेशोत्सवानिमित्त गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दहावी, बारावी तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून आमदार वडेट्टीवार बोलत होते.

यावेळी मंचावर ज्येष्ठ नेते डॉ.देविदास जगनाडे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष हितेंद्र राऊत, नगराध्यक्ष योगेश मिसार, न.प.उपाध्यक्ष डॉ.नीतीन उराडे, काॅंग्रेसचे प्रदेश सचिव थानेश्वर कायरकर, डॉ. नामदेव कोकोडे, नगरसेवक अनुकूल शेंडे, नगरसेवक पुष्पाकर बांगरे, नगरसेविका पुष्पलता पोपटे, अनुसूचित जाती सेलचे तालुकाध्यक्ष सुधाकर पोपटे या़सह अन्य मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करणे ही त्यांच्या पुढील वाटचालीला प्रोत्साहन देणारी बाब आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी केवळ गुणांपुरते मर्यादित न राहता ज्ञान, कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकासावर भर देणे आवश्यक आहे. यशासाठी मेहनतीसोबत सातत्य आणि आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने मोठे ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक उपक्रमांसोबतच सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविण्याचा प्रयत्न समितीच्या वतीने करण्यात येत आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा त्याचाच एक भाग असून, विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देण्याचे काम या उपक्रमातून होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी दहावी, बारावी तसेच विविध क्षेत्रांतील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. विद्यार्थी, पालक, समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये