कौटूंबिक हिंसाचार, लैंगिक शोषण, पिडीत महिलांच्या मदतीसाठी वन स्टॉप सेंटर
पुलगाव येथे गणेशोत्सवात महिला योजनांची जनजागृती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
माहिती व जनसंपर्क विभागाचा लोकसंवाद कार्यक्रम
वर्धा : कौटूंबिक हिंसाचार, लैंगिक शोषणाच्या पिडीत, मानवी वाहतुकीस बळी पडलेल्या, ॲसिड हल्ल्यातील महिलेस वैद्यकीय सुविधा, पोलिस मदत, समुपदेशन व कायदेशिर मदत उपलब्ध करुन देण्यासाठी वन स्टॉप सेंटर महिलांसाठी मोठा आधार आहे. वन स्टॉप सेंटरबाबत पुलगाव येथे गणेशोत्सवात जनजागृती करण्यात आली.
गणेशोत्सवात शासनाच्या विविध योजनांची जनजागृती करण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभाग, जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने लोकसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. पुलगाव येथील बाल हिंद गणेश मंडळ येथे आयोजित लोकसंवाद कार्यक्रमात वन स्टॉप सेंटरबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यक्रमास चाईल्ड लाईनचे जिल्हा समन्वयक आशिष मोडक, जिल्हा माहिती कार्यालयाचे दिलीप बोंडसे, बाल हिंद गणेश मंडळाचे अध्यक्ष अतिम ददगाल, माजी नगराध्यक्ष मनीष शाहू, शैलेश शाहू, निकलेश शाहू, पलाश चांडक, अभिनव अवस्थी, डेनी शर्मा, शुभम गुप्ता, प्रतिक शाहू, गौरव अरोरा, महेश दयालानी, अमोल गणेशपुरे, शशांक लेकुरवाळे, चेतन शर्मा, अमजद खान आदी उपस्थित होते.
कौटूंबिक हिंसाचारात बळी पडलेल्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाच्यावतीने मोफत विधी सेवा पुरविण्यासोबतच आर्थिक लाभ उपलब्ध करुन देण्यात येत आहे. जननी सुरक्षा योजनेंतर्गत संस्थेत प्रसूती होण्यासाठी भर देण्यात येतो. या योजनेंतर्गत घरी प्रसुती झाल्यास 500 रुपये, स्वाभाविक प्रसूती झाल्यास 700 रुपये तर सिझेरियनने प्रसूती झाल्यास 1 हजार 500 रुपये याप्रमाणे मानधन देण्यात येते. तसेच प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या माध्यमातून गर्भवती मातांना प्रसूतीपुर्व तपासणी, आवश्यक वैद्यकीय तपासण्या, समुपदेशन व सुरक्षित प्रसूतीसाठी शासनाच्यावतीने मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करुन दिल्या जात असल्याचे आशिष मोडक यांनी यावेळी सांगितले.
यावेळी महिलांची सुरक्षा, विविध प्रकारच्या योजनांची सविस्तर माहिती असलेली पत्रके उपस्थितांना वितरित करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता चाईल्ड हेल्पलाईनचे सूरज वानखेडे, साप्ताहिक देवळी दर्शनचे संपादक चंद्रकांत पवार, शिवप्रेरणाचे संपादक पंकज तिवारी, विदर्भाचा आवाज विदर्भ माझाचे संपादक हर्षल काळे व गणेश मंडळाचे कार्यकर्ते यांनी प्रयत्न केले.



