ताज्या घडामोडी

श्री गुरु तेग बहादूरजींचे जीवन मानवतेचा आदर्श; प्रवेशद्वार हे केवळ वास्तू नव्हे, तर प्रेरणेचे स्मारक – आ. सुधीर मुनगंटीवार

'हिंद-दी-चादर' प्रवेशद्वारातून शौर्य, त्याग आणि मानवतेचा संदेश; शीख समाजाच्या भावनांना आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा सन्मान

चांदा ब्लास्ट

आ. मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे ४५ लाखांच्या निधीतून साकारले भव्य प्रवेशद्वार; सातत्यपूर्ण पाठपुराव्याला गुरुद्वारा समितीकडून कृतज्ञतेची सलामी

चंद्रपूर :- चंद्रपूरातील तुकूम येथील श्री गुरुनानक दरबार गुरुद्वारासमोरील ‘श्री गुरु तेग बहादुरजी हिंद-दी-चादर प्रवेशद्वार’ उभारणीसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून ४५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देणारे राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा गुरुद्वारा समितीच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात कृतज्ञतापूर्वक गौरव करण्यात आला. गुरु तेग बहादुरजींच्या प्रकाश उत्सवानिमित्त साकारलेल्या या भव्य प्रवेशद्वाराच्या लोकार्पणानंतर आयोजित कार्यक्रमात बोलताना आ. मुनगंटीवार यांनी हे प्रवेशद्वार केवळ वाहतुकीसाठी उभारलेली वास्तू नसून, शौर्य, त्याग, मानवता, सेवाभाव आणि धर्मरक्षणाचा संदेश प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे प्रेरणास्थान असल्याचे सांगितले. तसेच गुरु तेग बहादुरजींचे बलिदान संपूर्ण मानवजातीसाठी आदर्श असून त्यांच्या स्मृतीला अभिवादन करणारे हे प्रवेशद्वार उभारण्याचे भाग्य लाभल्याचा अभिमानही त्यांनी व्यक्त केला.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या अथक प्रयत्नांतून श्री गुरु तेग बहादुरजी “हिंद-दी-चादर” यांच्या प्रकाश उत्सवानिमित्त या भव्य प्रवेशद्वाराची उभारणी करण्यात आली. या प्रवेशद्वाराचे भूमिपूजन २६ जानेवारी २०२४ रोजी आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले होते. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे गुरुद्वारा श्री गुरुनानक दरबारसमोर हे भव्य प्रवेशद्वार साकार झाले असून, त्यास ‘श्री गुरु तेग बहादुरजी हिंद-दी-चादर प्रवेशद्वार’ असे नामकरण करण्यात आले आहे. दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी गुरुद्वारा समितीच्या वतीने आयोजित समारंभात आ. मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते या प्रवेशद्वाराचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी अर्जुन सिंग धुन्ना आणि श्रीमती दशमीत वाधवा यांनी गुरु तेग बहादूरजींच्या जीवनावर आधारित सादर केलेल्या प्रभावी कार्यक्रमाचा उल्लेख करताना आ. मुनगंटीवार म्हणाले की, हे सादरीकरण पाहताना आपण इतिहासातील त्या गौरवशाली काळात पोहोचलो. गुरु तेग बहादूरजींना ‘हिंद-दी-चादर’ ही उपाधी का प्राप्त झाली, याची खरी अनुभूती या सादरीकरणातून मिळाली. त्याग, बलिदान, धर्मरक्षण आणि मानवतेसाठी संपूर्ण जीवन अर्पण करणाऱ्या गुरु तेग बहादूरजींचे कार्य आजही समाजाला प्रेरणा देणारे आहे. या उत्कृष्ट सादरीकरणासाठी त्यांनी अर्जुन सिंग धुन्ना व दशमीत वाधवा यांचे विशेष अभिनंदन केले.

या भव्य प्रवेशद्वारासाठी ४५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. या प्रवेशद्वाराची मागणी अर्जुन सिंग धुन्ना आणि त्यांच्या वडिलांनी सहकाऱ्यांसह केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत तातडीने निधी मंजूर करण्यात आला, असेही आ. मुनगंटीवार यांनी सांगितले. माझ्या दृष्टीने हे केवळ वाहनांची ये-जा करण्यासाठी उभारलेले प्रवेशद्वार नाही. हे प्रवेशद्वार प्रत्येकाच्या हृदयापर्यंत शौर्य, करुणा, त्याग, मानवता आणि सेवाभावाचा संदेश पोहोचवणारे प्रेरणास्थान आहे,” असे आ.मुनगंटीवार म्हणाले.

शीख समाजाच्या परंपरेचा गौरव करताना आ. मुनगंटीवार म्हणाले की, शौर्य, मानवता आणि निःस्वार्थ सेवेची शिकवण जगाला देण्याचे कार्य शीख समाजाने केले आहे. लंगराच्या परंपरेतून ‘भुकेल्याच्या पोटातच देव वसतो’ हा संदेश दिला जातो. खऱ्या अर्थाने ईश्वराची भक्ती करायची असेल, तर प्रथम भुकेल्याला अन्न द्यावे, त्यातूनच ईश्वर प्रसन्न होतो, हा शीख परंपरेचा महान संदेश संपूर्ण समाजासाठी मार्गदर्शक आहे.

गुरु तेगबहादूरजींनी कधीही कोणालाही धर्मांतराची शिकवण दिली नाही. उलट प्रत्येकाने आपल्या धर्मात राहून चांगले कार्य करावे, आपल्या श्रद्धा आणि मूल्यांचे रक्षण करावे, यासाठी त्यांनी स्वतःचे शिर अर्पण करून सर्वोच्च बलिदान दिले. त्यामुळे त्यांचे जीवन संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी नमूद केले.

अशा महान विभूतीच्या स्मरणार्थ हे भव्य प्रवेशद्वार उभारण्याचे भाग्य लाभल्याचा अभिमान व्यक्त करत, गुरुद्वारा समिती, शीख समाज आणि उपस्थित नागरिकांनी व्यक्त केलेल्या प्रेम, आत्मीय स्वागत आणि सन्मानाबद्दल आ. सुधीर मुनगंटीवार यांनी खालसा हेल्प फाउंडेशन टीम तेजेंदर सिंघ दारी, अर्जून सिंग धुना,बलबीर सिंह गुरोन, चिंटू गढ़ोंक, पुरण सिंघ जुनेजा, सोनू अनेजा,राजू सचदेवा, नीतू बावरे, श्री गुरुद्वारा गुरुनानक दरबार कमेटी चे आभार मानले. याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, हरविंदर सिंघ धुन्ना , काशिनाथ सिंग, सुनील डोंगरे यांच्यासह गुरुद्वारा समितीचे पदाधिकारी, शीख समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये