वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे घोषणेची भद्रावतीत पायमल्ली
३० वर्षांपूर्वीची कडुलिंब व करंजीची झाडे तोडल्याने संताप : जबाबदारांवर कारवाईची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती :- नगर परिषद क्षेत्रातील नागमंदिर ते विंजासन रोड परिसरातील सुमारे २५ ते ३० वर्षांपूर्वी लावण्यात आलेली कडुलिंब व करंजीची झाडे कोणतीही सार्वजनिक हरकत, वृक्ष संवर्धन समितीचा ठराव अथवा आवश्यक परवानगी नसताना तोडण्यात आल्याचा आरोप होत असून, या प्रकारामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, संबंधित प्रभागातील नगरसेवकांच्या उपस्थितीत ही झाडे तोडण्यात आली. विशेष म्हणजे संबंधित नगरसेवक हे वृक्ष संवर्धन समितीचे सदस्य असल्याचेही सांगितले जात आहे. झाडांमुळे कोणालाही कोणताही त्रास नसताना त्यांची कत्तल करण्यात आल्याने “वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे” या संत तुकाराम महाराजांच्या विचारांचीच पायमल्ली झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
झाडतोड करणाऱ्या ठेकेदाराच्या कर्मचाऱ्याला विचारणा केली असता, “आमच्याकडे झाड तोडण्याचा कोणताही लेखी आदेश नव्हता. नगरसेवकांनी सांगितल्यामुळे झाडे तोडावी लागली. आम्ही नकार दिल्यानंतरही दबाव टाकून झाडे तोडण्यास भाग पाडले,” असा दावा करण्यात आला. दुसरीकडे, नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता ठेकेदारावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, जर ठेकेदारावर कारवाई होणार असेल तर झाडतोडीस कारणीभूत ठरलेल्या संबंधित जबाबदार नगरसेवकांवरही कारवाई का करण्यात येऊ नये, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
एखाद्या सामान्य नागरिकाने विनापरवानगी झाड तोडल्यास त्याच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई केली जाते. मग लोकप्रतिनिधींना वेगळा न्याय का, असा प्रश्न उपस्थित करत स्थानिक नागरिक व पर्यावरणवादी संघटनांनी मुख्याधिकारी, नगर परिषद भद्रावती तसेच जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्याकडे संबंधित नगरसेवकांवरही चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे नगर परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, वृक्षसंवर्धनाबाबत प्रशासनाची भूमिका काय राहणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.



