कोरपणा नगरीत बंदरांचा वाढता उपद्रव
वन विभागाने तातडीने कारवाई करावी – नागरिकांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपणा :- शहरात गेल्या काही दिवसांपासून बंदरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बंदरांचे कळप घरांच्या छतावर, झाडांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी मुक्तपणे वावरत असल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना त्रास सहन करावा लागत आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, बंदरे घरांमध्ये घुसून अन्नधान्य व फळभाज्यांचे नुकसान करत आहेत. तसेच काही ठिकाणी नागरिकांवर धावून जाण्याच्या घटना घडल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे अपघात किंवा जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याबाबत वन विभागाने तातडीने दखल घेऊन बंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी कोरपणा शहरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाने वेळेत कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



