देवळी–वायगाव–निपाणी परिसरात अवैध दारूचा महापूर ; प्रशासनाचे दुर्लक्ष?

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
देवळी, वायगाव व निपाणी या गावांमध्ये अवैध दारू विक्रीचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करत असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. या भागात खुलेआम दारू विक्री सुरू असून, त्यामुळे गावातील सामाजिक वातावरण बिघडत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक ठिकाणी बेकायदेशीररित्या दारू विक्री केली जात असून, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जबाबदार असलेले राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासन यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. काही ठिकाणी तर शाळा, सार्वजनिक ठिकाणे व वस्ती परिसरातच दारू सहज उपलब्ध होत असल्याचे सांगितले जाते.
या अवैध व्यवसायामुळे तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे वळत असून, गुन्हेगारी घटनांमध्येही वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महिलांमध्ये व ज्येष्ठ नागरिकांमध्ये याबाबत तीव्र नाराजी दिसून येत आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी तातडीने लक्ष देऊन अवैध दारू विक्रीवर आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त कारवाई करून या अवैध धंद्यांवर कठोर पावले उचलावीत, तसेच दोषींवर कडक कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



