प्रदूषण वाढवणारे जुने युनिट हटवून ९८९२ कोटीचा नवीन विद्युत प्रकल्प चंद्रपुरात होणार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
चंद्रपूर येथील जुने विद्युत प्रकल्पातील संच हे कालबाह्य व तांत्रिकदृष्ट्या अप्रभावी झाले असल्यामुळे परिसरातील प्रदूषणात लक्षणीय वाढ होत असल्याची बाब हिवाळी अधिवेशनात सभागृहाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना माननीय मंत्री महोदय श्रीमती मेघनाताई बोर्डीकर यांनी चंद्रपूर येथे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवीन विद्युत प्रकल्प प्रस्तावित असल्याची माहिती सभागृहात दिली.
सुमारे ९८९२ कोटी रुपये खर्चाचा हा नवीन विद्युत प्रकल्प ८०० मेगावॅट क्षमतेचा असणार असून, तो पूर्णतः आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असेल. या नव्या प्रकल्पामुळे जुने व प्रदूषण वाढवणारे विद्युत संच टप्प्याटप्प्याने हटवले जाणार आहेत.
नवीन तंत्रज्ञानामुळे उत्सर्जनावर प्रभावी नियंत्रण ठेवता येणार असून, त्यामुळे भविष्यात चंद्रपूर परिसरातील वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणात घट होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरण संरक्षणासोबतच ऊर्जा निर्मितीमध्येही स्थिरता व कार्यक्षमता वाढणार आहे.



