संवेदनशील नेतृत्वाचा अस्त – आ. किशोर जोरगेवार

चांदा ब्लास्ट
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातच नव्हे, तर देशाच्या राजकारणात आणि सामाजिक क्षेत्रात अपूरणीय पोकळी निर्माण झाली आहे. सामाजिक भान, अनुभव आणि नेतृत्वगुण असलेला एक मोठा नेता आज आपल्यातून निघून गेला आहे.
माझ्यासारखा कार्यकर्ता पुढे गेला पाहिजे असे ते नेहमी मनापासून म्हणायचे. मी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवावी, अशी त्यांची इच्छा होती. अनेक वेळा त्यांनी मला वैयक्तिक पातळीवर मार्गदर्शन केले; त्यांच्या शब्दांनी आणि विश्वासाने मला नेहमीच बळ दिले.
त्यांनी माझ्या निवासस्थानी भेट देत ‘अम्मा का टिफिन या सेवाभावी उपक्रमाबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली होती. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहोचवण्याची त्यांची तळमळ आणि संवेदनशीलता त्या भेटीतून प्रकर्षाने जाणवली.
अजित पवार हे नेहमी स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडणारे नेतृत्व होते. होणारे काम असेल तर ते निर्भीडपणे “हो” म्हणायचे, आणि जे शक्य नाही त्यासाठी स्पष्टपणे “नाही” सांगण्याचे धाडस त्यांच्याकडे होते. शब्दांची गुंडाळी न करता, वास्तव स्वीकारून निर्णय घेणारा हा स्वभावच त्यांना वेगळा ठरवणारा होता. ही प्रामाणिकता आणि स्पष्टवक्तेपणा आजच्या राजकारणात दुर्मिळ आहे.
एक संवेदनशील, कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवणारा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा नेता देशाने गमावला आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे.
स्व. अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास सद्गती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना, समर्थकांना व लाखो चाहत्यांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो हीच माता महाकाली चरणी प्रार्थना करतो.



