आ. जोरगेवार यांच्या तत्परतेमुळे सात गावांचा पाणीपुरवठा पुन्हा सुरू
महिनाभरापासून खंडित असलेल्या प्रादेशीक पाणी पूरवठा योजनाला दिलासा, गावक-यांनी मानले आ. जोरगेवार यांचे आभार

चांदा ब्लास्ट
एक महिन्यांपासून खंडित असलेल्या सात गावांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न आमदार किशोर जोरगेवार यांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे अखेर सुटला असून गावकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबद्दल गावतील संरपच आणि शिखर समीतीच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेत आभार मानले आहे. यावेळी शिखर समीती अध्यक्ष प्रकाश शेंडे, चंदु माथने, प्रकाश अलवेलवार, नागाळा सरपंच शोभा चिमूरकर, शेणगाव सरपंच पुष्पा मालेकर, धानोरा सरपंच विजय आगरे, स्वप्निल शेडामे, सिदुर उपसरपंच संजय गणफाडे, यांच्यासह गावकर्यांची उपस्थिती होती.
चिंचाळा व सात गावे प्रादेशीक पाणी पूरवठा योजना अंतर्गत चिंचाळा, नागाळा, महाकुर्ला, वांढरी, धानोरा, सिदुर, व वेंढली या सात गावांना पाणीपुरवठा केला जात होता. मात्र महावितरणचे वीजबिल थकीत असल्याने पंपिंग स्टेशनचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे सातही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली होती.
या पार्श्वभूमीवर संबंधित गावांचे सरपंच आणि शिखर समितीचे अध्यक्ष यांनी आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेऊन तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली. समस्या समजताच आमदार जोरगेवार यांनी तत्काळ प्रशासनाशी संपर्क साधत गावांचे सरपंच, शिखर समितीचे प्रतिनिधी आणि महावितरणचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकितसिंह यांना दिल्या.
त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेत बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत १५ व्या वित्त आयोगाच्या बंधिस्त निधीतून वीजबिल भरण्यासाठी आराखडा सुधारित करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित अधिकार्यांना दिल्या. त्यानुसार महावितरणकडे काही दिवसांची मुदतवाढ देण्याची विनंती करण्यात आली.
महावितरणने ही मागणी मान्य करत वीजपुरवठा पुन्हा सुरू केला आहे. त्यामुळे पंपिंग यंत्रणा कार्यान्वित होऊन सातही गावांचा पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत झाला आहे.
आमदार किशोर जोरगेवार यांनी या प्रश्नात तातडीने हस्तक्षेप करून प्रशासनाच्या माध्यमातून मार्ग काढल्यामुळे गावकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबद्दल शिखर समितीचे पदाधिकारी आणि संबंधित गावांचे सरपंच यांनी आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेऊन त्यांच्या तत्परतेबद्दल आभार व्यक्त केले आहे.



