माणुसकी जपणारा एक लोकनेता हरपला – खा. धानोरकर

चांदा ब्लास्ट
“आज मन अतिशय विषण्ण झाले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे व्यक्तिमत्त्व आणि माझ्या वैयक्तिक आयुष्यात एका मोठ्या भावाचा आधार असलेले अजितदादा आपल्यातून असे अचानक निघून जातील, याची कल्पनाही करवत नाही. त्यांच्या जाण्याने राज्याच्या राजकीय पटलावर मोठी पोकळी निर्माण झाली असून, आमच्या कुटुंबाचे कधीही भरून न निघणारे वैयक्तिक नुकसान झाले आहे.
माझे पती, दिवंगत खासदार बाळू धानोरकर जेव्हा दिल्ली येथे गंभीर आजारी होते, तो काळ आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत कठीण आणि संघर्षाचा होता. ती बातमी समजताच अजितदादांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन रक्ताच्या नात्याप्रमाणे धाव घेतली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या स्वीय सहाय्यकांना तातडीने दिल्लीला पाठवले आणि उपचारांसाठी एअर अँब्युलन्सची व्यवस्था केली. संकटाच्या त्या काळात त्यांनी दिलेला तो ‘हक्काच्या भावाचा’ आधार मी कधीही विसरू शकणार नाही.
“अजितदादा केवळ प्रशासकीय शिस्त असलेले नेते नव्हते, तर ते नाती जपणारे एक हळवे व्यक्तिमत्त्व होते.”
खासदार साहेबांच्या निधनानंतरही ते दुःखात सहभागी होण्यासाठी आवर्जून घरी आले. मुंबईत जेव्हा कधी भेट व्हायची, तेव्हा ते केवळ राजकीय चर्चा न करता माझ्या आणि मुलांच्या तब्येतीची, शिक्षणाची अतिशय आपुलकीने विचारपूस करायचे. कोरोनाच्या भीषण काळातही, माझे पती खासदार म्हणून आणि मी आमदार म्हणून काम करत असताना, दादा सतत संपर्कात राहून आम्हाला मार्गदर्शन करायचे.
दादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावात शांत झाला आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीस मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. ईश्वराकडे हीच प्रार्थना की, त्यांच्या कुटुंबियांना आणि लाखो कार्यकर्त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो.”



