येल्लापुर येथे प्रजासत्ताक दिन देशभक्तीच्या वातावरणात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- भारतीय संविधानाच्या गौरवशाली परंपरेचे स्मरण करत येल्लापूर येथील ग्रामपंचायत पंचायत कार्यालय व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा येल्लापुर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयातील ध्वजारोहन उपसरपंच रंजिता जिवणे यांचे हस्ते तर जिल्हा परिषद शाळेतील ध्वजारोहन शाळा व्यवस्थापन अध्यक्षा वैशाली बनसोडे यांचे हस्ते करण्यात आले.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्य, नाट्यछटा तसेच प्रेरणादायी भाषणे सादर केली. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून संविधानाचे महत्त्व, स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान व नागरिकांची कर्तव्ये यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण लांजेवार, शिक्षकवर्ग, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद व भरभरून दाद मिळाली. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकवर्गाने विशेष परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानून प्रजासत्ताक दिनाच्या या प्रेरणादायी सोहळ्याची सांगता करण्यात आली.



