अमृत महोत्सवानिमित्त सुधाकर कडू यांचा आनंदवनात गौरव; वृक्षारोपणाने साजरा सोहळा
दिव्यांग बांधवांकडून ७५ दिव्यांनी औक्षण; मान्यवरांकडून सेवाभावी कार्याचा गौरव

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी.
राजेंद्र मर्दाने, वरोरा.
वरोरा : महारोगी सेवा समिती, आनंदवनाचे विश्वस्त, आनंद अंध विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक तसेच ग्रामपंचायत आनंदवनचे माजी उपसरपंच सुधाकर कडू यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त आनंदवन परिसरात वृक्षारोपण आणि गौरव सोहळा उत्साहात पार पडला. श्री. सुधाकर कडू स्नेहांकित परिवार व आनंदवन मित्र परिवार यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे होते. व्यासपीठावर समितीचे विश्वस्त डॉ. विजय पोळ, सदाशिवराव ताजने, कवीश्वर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी दिव्यांग बांधव व महिलांनी ७५ दिव्यांनी औक्षण करून सुधाकर कडू यांना शुभेच्छा दिल्या. अमृत महोत्सवानिमित्त आनंदवन परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात डॉ. विकास आमटे यांनी कडू गुरुजींनी आनंदवनासाठी केलेल्या दीर्घकालीन सेवाकार्याचा गौरव केला. समाजसेवा, शिक्षण आणि आनंदवनाच्या उभारणीसाठी त्यांनी आपल्या आयुष्याचा मोठा काळ अर्पण केल्याचे त्यांनी नमूद केले.
सदाशिवराव ताजने यांनी कडू गुरुजींच्या आनंदवनातील कार्यप्रवासाचा उल्लेख करत, “कडू गुरुजींनी आनंदवनासाठी आपले सर्वस्व अर्पण केले,” असे गौरवोद्गार काढले. यावेळी डॉ. विजय पोळ व माधव कवीश्वर यांनीही आपल्या मनोगतातून सुधाकर कडू यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
सत्काराला उत्तर देताना सुधाकर कडू म्हणाले की, “परदुःखाची जाणीव करून घेण्याची शिकवण मला आनंदवनाने दिली. त्यातूनच माझे व्यक्तिमत्त्व घडले. समाजातील दुःखी आणि वंचित घटकांचे दुःख दूर करण्यासाठी आनंदवनाच्या कार्यकर्त्यांनी पुढे येणे गरजेचे आहे.”
यापूर्वी नेत्रदानाचा संकल्प केल्यानंतर आता देहदानाचाही निर्णय घेतल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
कार्यक्रमाला पल्लवी आमटे, प्राचार्य डॉ. मृणाल काळे, प्राचार्य सुहास पोतदार, माजी प्राचार्य पुरुषोत्तम काळभूत, ग्रामसेविका विद्या गिलबिले, ग्रंथपाल संजय साबळे, पंडीत लोंढे, आनंदवनाचे कार्यकर्ते राजेश ताजणे, रवींद्र नलगिंटवार, पत्रकार, माजी प्राचार्य तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, महिला, शालेय विद्यार्थी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुधाकर कडू स्नेहांकित परिवार व आनंदवन मित्र परिवार यांनी विशेष परिश्रम घेतले. अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.



