गडचांदूर येथे ‘श्रीतेज प्रतिष्ठान’चा प्रथम वर्धापन दिन साजरा
भारतमातेच्या जयघोषाने आसमंत दुमदुमूला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
क्षेत्रातील माजी आमदारांच्या उपस्थितीत रंगला सांस्कृतिक सोहळा
‘ग्रीन गडचांदूर’ मोहिमेचे मान्यवरांकडून कौतुक
जिवती :- भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्याने, गडचांदूर नगराच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या ‘*श्रीतेज प्रतिष्ठान*’ चा प्रथम वर्धापन दिन विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
यानिमित्त आयोजित ‘तिरंगा सन्मान रॅली’ व सांस्कृतिक सोहळ्यामुळे संपूर्ण गडचांदूर शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाची सुरुवात दुपारी ३.०० वाजता महात्मा गांधी विद्यालय येथून ‘तिरंगा सन्मान रॅली’ने झाली. शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करणाऱ्या या रॅलीतून राष्ट्रप्रेम, सामाजिक एकात्मता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
सायंकाळी ६.०० वाजता गांधी चौक येथे मुख्य सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार ॲड वामनराव चटप हे होते, तर उद्घाटन माजी आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार ॲड संजय धोटे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माजी आमदार सुदर्शन निमकर, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजय बावणे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक विलास धांडे, जेष्ठ व्यक्तित्व सतिश धोटे उपस्थित होते.
प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष निलेश शं. ताजने यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या वर्षभरातील कार्याचा आढावा घेतला व भविष्यातील संकल्प मांडले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी श्रीतेज प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचा विशेष गौरव केला. विशेषतः पर्यावरण रक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘ग्रीन गडचांदूर’ या मोहिमेचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय, प्रशासकीय, शैक्षणिक, वैद्यकीय व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या प्रतिभावंतांचा तसेच नववर्चित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये संजीवनी दिलीप चव्हाण हिची सौदी अरेबियातील Flynas International Airlines मध्ये हवाईसुंदरी (एअर होस्टेस) म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झाल्याबद्दल गौरव करण्यात आला.
तसेच शिक्षण क्षेत्रातील डॉ. प्रा. प्रफुल्ल शांताराम काटकर, वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. मनीषा किनाके, रोप स्किपिंगमध्ये राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता रुद्र आनंद हिंगाणे व राष्ट्रीय स्तरावरील खुशी वाघमारे, व्हॉलीबॉल राष्ट्रीय स्तरावरील गुंजन अनिल पिंपळकर व दृढ संकल्प स्पोर्टिंग क्लब, तसेच एमपीएससीद्वारे टॅक्स असिस्टंट म्हणून निवड झालेल्या पूर्वीता वासुदेव मून आणि इन्कम टॅक्स विभागात नियुक्त पल्लवी मधुकर खाडे यांचाही सत्कार करण्यात आला.
या सोहळ्यात विविध शाळा, विद्यालय व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिहर खरवडे गुरूजी यांनी केले, तर महेंद्र मंदे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीतेज प्रतिष्ठानच्या सर्व स्वयंसेवकांनी व शहरातील नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले.
“सामाजिक बांधिलकी जपत शहराचा सर्वांगीण विकास करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. भविष्यातही ‘ग्रीन गडचांदूर’सारखे अनेक लोकहितकारी प्रकल्प आम्ही सातत्याने राबवू.”
– श्रीतेज प्रतिष्ठान, गडचांदूर



