प्रजासत्ताक दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अवहेलना
जिवतीतून प्रशासनाला निवेदन, आंदोलनाचा इशारा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- प्रजासत्ताक दिनासारख्या राष्ट्रीय व पवित्र दिवशी भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जाणीवपूर्वक अवहेलना केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ही घटना २६ जानेवारी २०२६ रोजी लाल बहादुर शास्त्री विद्यालय, गडचांदूर (ता. कोरपना, जि. चंद्रपूर) येथे घडली असून, या प्रकारामुळे आंबेडकरी अनुयायी, बौद्ध समाज व संविधानप्रेमी नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा न लावणे, त्यांच्या संदर्भात अवमानकारक शब्दप्रयोग करणे तसेच संविधानावर भाषण करणाऱ्या माजी विद्यार्थ्याला मध्येच थांबविण्यात आल्याचा आरोप आहे. हा प्रकार केवळ एका समाजाचा नसून, संपूर्ण भारतीय संविधान व लोकशाही मूल्यांचा अपमान असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या घटनेच्या निषेधार्थ भारतीय बौद्ध महासभा तालुका जिवती, वंचित बहुजन आघाडी तालुका जिवती तसेच आंबेडकरी अनुयायी यांच्या वतीने तहसीलदार, तहसील कार्यालय जिवती यांच्या मार्फत जिल्हाधिकारी चंद्रपूर, पोलीस अधीक्षक चंद्रपूर व जिल्हा शिक्षणाधिकारी जि.प.चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे घटनेचे शिल्पकार असून त्यावरच भारतीय लोकशाही उभी आहे. त्यांच्या अवमानामुळे लाखो आंबेडकरी अनुयायी व संविधानप्रेमी नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे संबंधित संस्थाचालक, मुख्याध्यापक व दोषींवर तात्काळ कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करावी, शाळेकडून संविधानिक मूल्यांचे पालन होईल याबाबत लेखी हमी घ्यावी, भविष्यात अशा घटना घडू नये याकरिता शिक्षण विभागाने स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात तसेच दोषींनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणाची तात्काळ दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे. निवेदन देताना भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष दिपक साबने, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बालाजी सोनकांबळे, भा.बौ.म.चे कोषाध्यक्ष बळीराम काळे, उपाध्यक्ष (संरक्षण) प्रल्हाद काळे, हरिश्चंद्र सरोदे, प्रदीप काळे, किर्लोस गायकवाड, कल्याण सरोदे, नवनाथ तिबोटे, ज्ञानेश्वर गायकवाड, ज्ञानपाल सरोदे, बाळू कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



