ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुजोर प्रशासनाच्या हेळसांड विरोधात प्रशांत डांगे यांचा एल्गार

ब्रम्हपुरीत आमरण उपोषण, रस्ते की मृत्यूचे सापळे?

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी – वडसा महामार्गाच्या कामातील प्रचंड दिरंगाई, निकृष्ट दर्जा आणि पूर्णतः बेजबाबदार नियोजनामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहे. रस्त्यावर पसरलेली बिसाई, सतत उडणारी धूळ, काम सुरू होण्याआधीच उखडून टाकलेले संपूर्ण डांबरीकरण, त्यातून निर्माण झालेले खोल खड्डे आणि त्यात साचलेले पाणी, या सगळ्यामुळे महामार्ग नव्हे तर मृत्यूचा सापळाच तयार झाला आहे.

या गंभीर व संतापजनक परिस्थितीविरोधात रिपब्लिकन पक्ष खोरिपाचे शहराध्यक्ष प्रशांत डांगे यांनी २६ जानेवारीपासून बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे चौक, ब्रह्मपुरी येथे आमरण उपोषण सुरू केले असून आज उपोषणाचा चौथा दिवस आहे.

हा लढा केवळ रस्त्यासाठी नसून, नागरिकांच्या जीवित सुरक्षेसाठी आहे, असे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे.

महामार्गावरील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वार, वाहनचालक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्णवाहिका, व्यापारी आणि शेतकरी सर्वच धोक्यात आले आहेत. उडणाऱ्या धुळीमुळे डोळ्यांचे आजार, श्वसनाचे विकार, मानेचे व कमरेचे दुखणे वाढले असून अनेक अपघात घडले आहेत. धुळीमुळे समोरचे वाहन दिसत नसल्याने जीवघेणे अपघात घडत आहेत. या सगळ्याला जबाबदार कोण, असा सवाल आता नागरिक उघडपणे करत आहेत.

नियमानुसार रस्त्याचे काम टप्प्याटप्प्याने, एका बाजूने करणे अपेक्षित असताना संबंधित कंत्राटदाराने संपूर्ण रस्ता उखडून टाकून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू केला आहे. हा केवळ निष्काळजीपणा नसून नागरिकांविषयीची अमानुषता आहे, असा संतप्त आरोप होत आहे.

महामार्गाच्या दुरवस्थेबाबत मागील अनेक महिन्यांपासून निवेदने देऊनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही. महसूल प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर परिषद, पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचे संशयास्पद मौन नागरिकांच्या रोषाला कारणीभूत ठरत आहे.

याच महामार्गावरून अवैध वाळू तस्करीची जड वाहने भरधाव वेगाने धावत असून अपघात वाढत आहेत. यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने, हा आर्थिक स्वार्थाचा मुद्दा तर नाही ना, असा थेट प्रश्न उपोषणकर्ते उपस्थित करत आहेत.

ब्रह्मपुरी – आरमोरी मार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाचे काम तसेच भुती नाला पुलाचे काम वर्षानुवर्षे अपूर्ण आहे. नगर परिषदेमार्फत गटार लाईनसाठी फोडलेले पक्के रस्ते अर्धवट अवस्थेत असून पावसाळा आणि उन्हाळा दोन्ही ऋतूंमध्ये नागरिकांसाठी हे रस्ते जीवघेणे ठरत आहेत. संपूर्ण शहरच खोदून ठेवण्यात आल्याचे चित्र आहे.

जर आताही प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि कंत्राटदार जागे झाले नाहीत, तर या दुर्लक्षाचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा स्पष्ट इशारा नागरिकांकडून दिला जात आहे. उपोषणस्थळी नागरिकांचा वाढता पाठिंबा हा प्रशासनासाठी इशाराच मानला जात आहे.

हा लढा रस्त्यासाठी नाही, तर माणसाच्या जीवासाठी आहे. आता तरी प्रशासन जागे होणार का, हाच खरा प्रश्न आहे.

उपोषणकर्त्यांच्या मागण्या

प्रशांत डांगे यांनी लेखी मागण्या प्रशासनासमोर मांडल्या असून त्या पूर्ण झाल्याशिवाय उपोषण मागे न घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. • ब्रह्मपुरी – वडसा महामार्गाचे काम ठराविक कालमर्यादेत पूर्ण करावे • ब्रह्मपुरी – आरमोरी रेल्वे उड्डाण पुलाचे काम तातडीने सुरू करावे • भुती नाला व उड्डाण पुलाच्या कामात दिरंगाई करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी • नगर परिषदेमार्फत फोडलेले सर्व रस्ते तातडीने दुरुस्त करावेत • शहरातील अवैध रेती तस्करी तात्काळ बंद करून दोषींवर कठोर कारवाई करावी.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये