पीक पाहणी : पोंभुर्णा तालुक्यात रब्बी हंगाम २०२५–२६ साठी पीक नोंदणी प्रक्रिया सुरु
शेतकऱ्यांनी वेळेत व अचूक नोंदणी करण्याचे तहसीलदारांचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
पोंभुर्णा तालुक्यात रब्बी हंगाम २०२५–२६ साठी ई-पीक पाहणी (Digital Crop Survey – DCS) मोबाईल अॅपद्वारे पीक नोंदणी प्रक्रिया दिनांक १० डिसेंबर २०२५ पासून सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार, पोंभुर्णा यांनी दिली आहे.
राज्य शासनाच्या AgriStack संकल्पनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या पिकांची माहिती डिजिटल स्वरूपात संकलित करण्यात येत असून, याच माहितीच्या आधारे पीक विमा, नैसर्गिक आपत्ती मदत, कर्जविषयक सुविधा तसेच विविध शासकीय योजनांचे लाभ देण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतातील रब्बी पिकांची नोंदणी वेळेत व अचूक करणे अत्यंत आवश्यक आहे.
पीक पाहणी कालावधी :
१) शेतकरी स्तरावरील नोंदणी :
दिनांक १० डिसेंबर २०२५ ते २४ जानेवारी २०२६
२) सहाय्यक स्तरावरील तपासणी :
दिनांक २५ जानेवारी २०२६ ते १० मार्च २०२६
शेतकरी स्वतःच्या मोबाईलवरून Google Play Store वर उपलब्ध असलेले “ई-पीक पाहणी (DCS)” अॅप डाउनलोड करून पिकांची नोंदणी करू शकतात. नोंदणी करताना अडचण आल्यास तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी मित्र तसेच ग्रामस्तरीय कर्मचारी यांची मदत घेता येणार आहे.
पोंभुर्णा तालुक्यात ई-पीक पाहणीची मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत असून, यासाठी ग्रामसभा, कॅम्प, प्रत्यक्ष मार्गदर्शन व जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. अॅप वापराबाबत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येत असून, कोणताही शेतकरी पीक नोंदणीपासून वंचित राहू नये यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
ई-पीक पाहणीमध्ये सक्रिय सहभाग घेऊन शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या ग्रामपातळीवरील कार्यकर्ते, कृषी मित्र, स्वयंसेवक व कर्मचाऱ्यांना तहसील कार्यालयामार्फत प्रोत्साहनपर प्रमाणपत्रे देण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
तरी सर्व शेतकऱ्यांनी वेळेत व अचूक पीक नोंदणी करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार, पोंभुर्णा यांनी केले आहे.



