वैद्यकीय सेवेतून समाजऋण फेडणारे व्यक्तिमत्त्व हरपले
डॉ. मोरेश्वरजी कळसकर यांचे दुःखद निधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी :- चौगान व परिसरातील जनतेसाठी अहोरात्र आरोग्यसेवेचा वसा जपणारे, गरीब-गरजू रुग्णांचे देवदूत म्हणून ओळखले जाणारे, बहुआयामी व अष्टपैलू व्यक्तिमत्त्व डॉ. मोरेश्वर हरीभाऊ कळसकर (वय ७२) यांचे शुक्रवार, दि. १२ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ८.४० वाजता मुंबई येथे उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.चौगान, जुगनाळा, कसर्ला, रानबोथली, किन्ही, बेटाळा, रणमोचन आदी गावांची जीवनवाहिनी ठरलेल्या डॉ. कळसकर यांनी अनेक दशकांपर्यंत अविरत वैद्यकीय सेवा दिली. असंख्य रुग्णांचे प्राण वाचवत त्यांनी मानवतेचा आदर्श घालून दिला.
गरीब व गरजू रुग्णांसाठी त्यांनी अनेकदा मोफत उपचार करून सामाजिक बांधिलकी जपली. आरोग्याबरोबरच शिक्षण व गावविकासासाठीही त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला. सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले डॉ. कळसकर ब्रम्हपुरी तालुक्यात परिचित व आदराचे नाव होते. कुटुंबसंस्कार व शिक्षणाला त्यांनी विशेष महत्त्व दिले. त्यांचा मोठा मुलगा अभियंता असून अमेरिकेत उच्च पदावर कार्यरत आहे, तर धाकटा मुलगा स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन मुंबई पोलीस दलात सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) म्हणून सेवा बजावत आहे. त्यांच्या निधनाने चौगान व परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव शनिवार, दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी त्यांच्या कर्मभूमी चौगान येथे आणण्यात आले. दुपारी ४ वाजता चौगान येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारावेळी राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून अंतिम श्रद्धांजली वाहिली.
यामध्ये माजी आमदार प्रा. अतुल देशकर, ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष खेमराज तिडके, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कृष्णलाल सहारे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमूरकर, ब्रम्हपुरी पंचायत समितीचे माजी सभापती रवींद्र मेश्राम, सरपंच उमेश धोटे, प्राचार्य अरुण शेंडे यांच्यासह असंख्य नागरिकांचा समावेश होता. डॉ. मोरेश्वरजी हरीभाऊ कळसकर यांच्या जाण्याने सामाजिक चळवळींना दिशा देणारे, न्याय-अधिकारांसाठी लढणारे व प्रगतिशील मूल्यांचे भक्कम नेतृत्व हरपले आहे. चौगान व परिसरातील जनतेच्या मनात त्यांची सेवा, कार्य व आठवणी सदैव जिवंत राहतील._



