अखेर नैतामगुडा येथे स्वस्तधान्य पोहोचले; पेसा गावात आनंदाचे वातावरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कोरपना :_ गट ग्रामपंचायत बिबी अंतर्गत येत असलेल्या धामणगाव येथे धामणगाव व नैतामगुडा अशा दोन गावांचे धान्य वाटप होत होते. स्वस्त धान्य धामणगावात येत असल्याने नैतामगुडा येथील लाभार्थ्यांना राष्ट्रीय महामार्ग ओलांडून सुमारे दीड किलोमीटर अंतर फिरून जावे लागत होते. गावाजवळ महामार्गावर डिव्हायडर नसल्याने रस्ता ओलांडताना अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला होता. या गंभीर समस्येकडे धामणगाव येथील युवा कार्यकर्ते सुशांत मिलमिले यांनी अन्नपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. तसेच गावकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती.
या प्रयत्नांना अखेर यश आले असून शुक्रवारी पहिल्यांदाच नैतामगुडा येथे थेट स्वस्त धान्य पोहोचले. शंभर टक्के आदिवासी लोकसंख्या असलेल्या या पेसा गावात धान्य वितरण सुरू होताच नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्टपणे दिसून आला.
या वेळी नैतामगुडा येथे एकूण ५६ राशनकार्डधारकांना धान्याचे वितरण करण्यात आले. यामध्ये ४६ अंत्योदय आणि १० अन्नपूर्णा राशनकार्डांचा समावेश होता. लाभार्थ्यांसाठी १२.५ क्विंटल तांदूळ व ६ क्विंटल गहू असा एकूण १८.५ क्विंटल धान्याचा पुरवठा करण्यात आला.
यावेळी गावकऱ्यांनी तहसीलदार, जिल्हा पुरवठा अधिकारी, तालुका पुरवठा निरीक्षक तसेच अन्नपुरवठा विभागातील संबंधित अधिकाऱ्यांचे आभार मानले.
नैतामगुडा येथील अनेक लाभार्थी रस्ता ओलांडून अपघात होण्याच्या भीतीने घरातील मुलांना रेशन उचलण्याकरिता पाठवत नव्हते. त्यामुळे येथील आदिवासी लोकांना स्वस्तधान्यापासून वंचित राहावे लागत होते. आपल्या कामातून सवड मिळाल्यानंतर धान्य उचलायला गेल्यास धान्य संपले असे सांगून स्वस्त धान्य दुकानदाराकडून नैतामगुडा येथील लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित ठेवण्यात येत होते. त्यामुळे आम्ही आवाज उठवला आणि शुक्रवारी गावात धान्य पोहोचले. या निर्णयामुळे आम्ही समाधानी आहोत.
– सुशांत मिलमिले, सामाजिक कार्यकर्ता



