सीसीआयकडून आता २३ क्विंटल कापूस खरेदी होणार!
आमदार देवराव भोंगळे यांचा पुढाकार; पणन विभागाचा निर्णय

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय काल (दि. ११) विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात घेण्यात आला आहे. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने भारतीय कापूस महामंडळ (CCI) कडून आता हेक्टरी २३ क्विंटल कापूस खरेदी करण्याची घोषणा केली आहे.
पूर्वी कापूस खरेदीची मर्यादा हेक्टरी १४ क्विंटल होती, ती वाढवून आता २३ क्विंटल करण्यात आली आहे. या घोषणेमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होणार असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. देवराव भोंगळे यांनी यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, पणन मंत्री ना. जयकुमारजी रावल व पणन सचिव यांना सातत्याने पत्रव्यवहार करून ही बाब निदर्शनास आणून दिली होती. त्यांच्या मागणीमुळे आणि सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळेच हा शेतकरी हिताचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयानुसार, शेतकऱ्यांचा कापूस विकत घेण्यासाठी जिनिंग युनिट्स आता आठवड्यातून ५ दिवस सुरू राहणार आहेत. पूर्वी सीसीआयला कापूस विकण्यासाठी जिनिंग युनिट्स फक्त २ ते ३ दिवस सुरू राहायचे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा विलंब आणि त्रास सहन करावा लागत होता, जो आता दूर होईल.
यासोबतच, जिवती व कोपरना तालुका हा डोंगराळ व दुर्गम असल्याने याठिकाणी नेटवर्कमुळे ऑनलाईन नोंदणीत येत असलेल्या अडचणी तसेच शेतकऱ्यांना असलेल्या तंत्रज्ञानाच्या अज्ञानामुळे होणारा त्रास लक्षात घेऊन सीसीआय आता सकारात्मक उपाययोजना करणार असुन ऑनलाईन स्लॉट बुकिंगसाठी अडचण येत असलेल्या शेतकऱ्यांसाठी हेल्पडेस्क (Helpdesk) सुद्धा तयार करण्यात येईल.
राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. देवराव भोंगळे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि विधानसभेत केलेल्या मागणीमुळेच हा शेतकरी हिताचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.



