महिला व बालकल्याण अंतर्गत नगर परिषद भद्रावती तर्फे महिला दिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
जागतिक महिला दिनानिमित्त नगर परिषद भद्रावतीच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने सेवादल मैदान व नगर परिषद संकुल येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम व आकर्षक रांगोळी स्पर्धेचे आयोजन उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमाला शहरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमात महिलांनी सामूहिक नृत्य व विविध सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे आपली कला सादर केली. तसेच रांगोळी स्पर्धेत सहभागी महिलांनी सामाजिक संदेश देणाऱ्या कल्पक रांगोळ्यांची मांडणी करून उपस्थितांची मने जिंकली. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून जागतिक स्तरावर मोठी रांगोळी साकारणारे प्रल्हादजी ठक (वरोरा) यांनी काम पाहिले.
रांगोळी स्पर्धेत प्रथम माधुरी अपूर्वा रॉय (₹५०००), द्वितीय जयश्री किशोर देशकर (₹३०००), तृतीय तेजस्विनी प्रशांत क्षीरसागर (₹२०००), चतुर्थ सविता शशिकांत परचाके (₹१५००) व पाचवा क्रमांक पूजा राजू मुदगल (₹१०००) यांनी पटकावला.
सामूहिक नृत्य स्पर्धेचे परीक्षण रमेश खातखेडे, नफिज अहमद व शालीक दानव यांनी केले. या स्पर्धेत प्रथम तेजस्विनी महिला ग्रुप (₹७०००), द्वितीय रणरागिणी महिला ग्रुप (₹५०००), तृतीय आदर्श महिला ग्रुप (₹३०००), चतुर्थ कांतीवीर महिला ग्रुप (₹२०००) व पाचवा ऑलराऊंडर ग्रुप (₹१५००) यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
यावेळी नगर परिषद भद्रावतीच्या आरोग्य विभागातील आठ महिला सफाई कामगारांचा शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. तसेच ‘लोकमत सखी मंच’ भद्रावती समूहाने पर्यावरण जनजागृतीसाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. भद्रावतीची कु. रेवा कौरासे हिने मराठी ‘कलर्स बिग बॉस’मध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल तिचाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला नगराध्यक्ष प्रफुल चटकी, उपाध्यक्ष सुधीर सातपुते, महिला व बालकल्याण समिती सभापती शोभा पारखी, तसेच विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक, मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने आयोजित हा उपक्रम महिलांना प्रोत्साहन देणारा व त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.



