महावितरणचा अजब कारभार: एका बाजूला मदतीचा हात
तर दुसऱ्या बाजूला लाचेची मागणी आणि दंडाचा बडगा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा तालुक्यातील महावितरण कंपनीचा सध्या दुहेरी चेहरा समोर येत असून, एका बाजूला संवेदनशीलता तर दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होत असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात
काही दिवसांपूर्वी आळंद येथील एका शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेची दखल घेत उपविभागीय कार्यकारी अभियंता संदीप शेटे यांच्या अध्यक्षतेखाली महावितरणने सामाजिक दायित्व जपत मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला तत्काळ २० हजार रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली. महावितरणच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असतानाच, दुसरीकडे एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणाने विभागाची प्रतिमा मलिन केली आहे.
भरारी पथकाकडून लाचेची मागणी आणि दंडाची कारवाई
शहरातील सिव्हिल कॉलनी येथील रहिवासी शेख वाहेद शेख बिस्मिल्ला यांच्या घरी गडचिरोली येथून आलेल्या महावितरणच्या भरारी पथकाने तपासणी केली. शेख वाहेद यांचा आरोप आहे की, या पथकाने त्यांच्याकडे १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. ही लाच देण्यास नकार दिल्याने पथकाने “तुमचे मीटर बायपास आहे” असा ठपका ठेवत त्यांना तब्बल ७० हजार रुपयांचा दंड आकारला. कोणतीही चूक नसताना केवळ लाच दिली नाही म्हणून ही सूडबुद्धीने कारवाई केल्याचे पीडित ग्राहकाने म्हटले आहे.
सामाजिक कार्यकर्ते शेख कदीर यांचे उपविभागीय अभियंत्यांना निवेदन
आपल्यावर झालेला अन्याय पाहून शेख वाहेद यांनी शहरातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते शेख कदीर यांच्याकडे धाव घेतली आणि घडलेला सर्व प्रकार कथन केला. सामाजिक बांधिलकी जपत शेख कदीर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्यांनी तत्काळ देऊळगाव राजा येथील उपविभागीय कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन सादर केले.
या निवेदनात त्यांनी मागणी केली आहे की, भरारी पथकाकडून सर्वसामान्य नागरिकांची होणारी अडवणूक थांबवण्यात यावी आणि शेख वाहेद यांच्यावर झालेला अन्याय दूर करून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. “एकीकडे प्रशासन मदतीचा हात देते आणि दुसरीकडे काही कर्मचारी भ्रष्टाचाराचा मार्ग अवलंबतात, हे खपवून घेतले जाणार नाही,” असा इशाराही यावेळी देण्यात आला.
आता या प्रकरणावर महावितरणचे वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.



