ताडाळी परिसरातील विविध प्रश्नांवर तोडगा निघण्यासाठी खा. धानोरकर यांच्याकडे मागणी

चांदा ब्लास्ट
ताडाळी, पडोली, मोरवा गावांसह रेल्वे लाईन व मालधक्क्यामुळे प्रभावित झालेल्या परिसरातील नागरिकांच्या तातडीच्या प्रश्नांवर त्वरित तोडगा निघावा यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व रेल्वे विभाग यांची संयुक्त बैठक घेण्याची मागणी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दिनेश दादाजी चोखारे यांनी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याकडे केली आहे.
रस्त्यांची दुरवस्था व वीज पुरवठा खंडित
गेल्या काही वर्षांपासून ताडाळी, पडोली व मोरवा गावांतील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. सर्वत्र खड्ड्यांमुळे नागरिक, शेतकरी व विद्यार्थ्यांना प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात ही परिस्थिती अधिक बिकट बनते. याशिवाय वारंवार खंडित होणारा विजेचा पुरवठा हा नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाकडून अद्याप ठोस पावले उचललेली नाहीत, अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
शाळेच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायम
रेल्वे लाईनच्या कामामुळे ताडाळी गावातील जिल्हा परिषद शाळेचे पुनर्वसन आवश्यक ठरले आहे. यासाठी रेल्वे विभागाकडून निधी मंजूर होऊन जिल्हा परिषदेकडे जमा झाला असतानाही पुढील कारवाई झालेली नाही. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले आहे. पालक व ग्रामस्थांतून याविषयी नाराजी व्यक्त होत असून, त्वरित शाळेचे पुनर्वसन करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
रेल्वे मालधक्का परिसरातील प्रदूषण
रेल्वे मालधक्क्यातून मोठ्या प्रमाणावर कोळसा, सिमेंट, इतर मालाची वाहतूक केली जाते. या मालवाहतुकीदरम्यान उडणाऱ्या धुळीमुळे परिसरात प्रदूषण वाढले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. श्वसनाचे आजार वाढत असल्याची तक्रार नागरिक व व्यापाऱ्यांनी केली आहे. लहान मुले व वृद्धांना याचा विशेष त्रास होत आहे. अनेकदा तक्रारी करूनही उपाययोजना न झाल्याने ग्रामस्थांचा संताप वाढला आहे.
ठोस निर्णयाची गरज
या सर्व समस्या लक्षात घेता, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व रेल्वे विभाग यांच्या संयुक्त बैठकीत ठोस निर्णय घेणे गरजेचे असल्याचे दिनेश चोखारे यांनी स्पष्ट केले. ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनांच्या आधारे शासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याकडे केली आहे.