निबंध स्पर्धेतून उमटले मानव_वन्यजीव संघर्षाच्या उपाययोजनांचे नवजीवन.!
गोजोली येथील नवजीवन विद्यालयात वन्यजीव सप्ताहाची सांगता

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
वन विभाग धाबा अंतर्गत वन्यजीव सप्ताहाची सांगता एका स्तुत्य उपक्रमाने करण्यात आली. गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली येथील नवजीवन विद्यालय येथे ‘मानव व वन्यजीव संघर्ष उपाययोजना’ या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या निबंध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी विविध उपाययोजना आपल्या लेखणीतून मांडल्या. यामध्ये उत्कृष्ट सादरीकरण करत तीन विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
प्रथम पुरस्कार कु. कृतिका लक्ष्मण मोहर्ले, द्वितीय पुरस्कार मानव पांडुरंग लेनगूरे आणि तृतीय पुरस्कार देव खुशाल राऊत यांनी पटकाविले.
विजेत्या विद्यार्थ्यांना वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर गौरकर यांच्या हस्ते आकर्षक स्टडी टेबल आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी वन्यजीव संरक्षण आणि निसर्गाचा समतोल राखण्यामध्ये विद्यार्थ्यांची भूमिका किती महत्त्वाची आहे, यावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाला वन विभागाचे क्षेत्र सहाय्यक भगीरथ पुरी, मेश्राम, वनरक्षक झारखंडे, नागरे, कातकर तसेच नवजीवन विद्यालयाचे मुख्याध्यापक आडबाले आणि संपूर्ण शिक्षक वृंद प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा प्रशासन आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.



