प्रधानमंत्री आवास योजनेत प्रभाग क्रमांक ४ अव्वल
३४ लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.
घुग्घूस, चंद्रपुर : नगर परिषद घुग्घूसच्या प्रभाग क्रमांक ४ ने विकासकामांसोबतच केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीतही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. घुग्घूस शहरातील सर्वाधिक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देत प्रभाग क्रमांक ४ ने शहरात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ही कामगिरी नगरसेवक विवेक बोढे यांच्या प्रयत्नांचे यश असल्याचे प्रभागातील नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घुग्घूस शहरातील एकूण ८७ लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळाला असून, त्यापैकी तब्बल ३४ लाभार्थी प्रभाग क्रमांक ४ मधील आहेत. त्यामुळे गरजू नागरिकांना घरकुल योजनेचा सर्वाधिक लाभ मिळवून देणारा प्रभाग म्हणून प्रभाग क्रमांक ४ ने शहरात अव्वल स्थान मिळविले आहे
प्रभागातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच गरजू कुटुंबांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी नगरसेवक विवेक बोढे सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून अनेक कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार होण्यास मदत झाली आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रभाग क्रमांक ४ मधील नागरिकांनी नगरसेवक विवेक बोढे यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक गरजू नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी यापुढेही प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचे नगरसेवकांनी सांगितले.
यावेळी प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी व प्रभागातील नागरिक उपस्थित होते.



