ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पिर्ली येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पीक कापणी प्रयोग

दुष्काळी परिस्थितीत उत्पादनाची अचूक नोंद घेण्याच्या सूचना : १९ हजार ७२७ हेक्टरवरील पीक पंचनामे पूर्ण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

जिल्ह्यात कमी पर्जन्यमान व पावसातील खंडामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भद्रावती तालुक्यातील मौजा पिर्ली येथे गुरुवारी (दि. ८) पीक कापणी प्रयोग घेण्यात आला. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी नथ्थू महादेव डाखरे यांच्या शेतात प्रत्यक्ष उपस्थित राहून पीक कापणी व मळणी प्रक्रियेची पाहणी केली.

पीक कापणी प्रयोगातून प्राप्त होणारी उत्पादनाची आकडेवारी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याने नोंदी अचूक, वस्तुनिष्ठ व पारदर्शक पद्धतीने करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी पंत यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. तसेच त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

पंचनामे वस्तुनिष्ठ पद्धतीने करण्याचे निर्देश

दुष्काळी परिस्थितीत झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे वस्तुनिष्ठ पद्धतीने करून उर्वरित कार्यवाही गतीने पूर्ण करावी. पात्र नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. महसूल व कृषी विभागाने समन्वयाने काम करून शेतकऱ्यांच्या अडचणींना प्राधान्याने सोडवावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी पंत यांनी दिले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकरराव तोटावार यांनी परिसरातील पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. दुष्काळी परिस्थितीत पिकांचे योग्य व्यवस्थापन, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर, जमिनीतील ओलावा टिकविणे आणि पीक संरक्षणाबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

१९ हजार ७२७ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण

भद्रावती तालुक्यात ३८ हजार ८१९.७० हेक्टर पेरणी क्षेत्र असून ३७ हजार ५४३ खातेदार आहेत. आतापर्यंत १९ हजार ७२७.९६ हेक्टर क्षेत्रावरील पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून उर्वरित क्षेत्रातील कार्यवाही सुरू आहे. महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त पथकांकडून प्रत्यक्ष शेतावर जाऊन नुकसानीची नोंद केली जात आहे.

यावेळी अपर तहसीलदार सोनाली तेटगुरे, तालुका कृषी अधिकारी सुशील आडे, नायब तहसीलदार मधुकर काळे, मंडळ कृषी अधिकारी विकास चवले यांच्यासह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी, विमा प्रतिनिधी आणि शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये