तोहोगावातील बाजारओट्याचा वापर कडबा-कुटार आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी?
ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे पंधरा लाख पाण्यात.!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी तालुक्यातील गावांमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी शासनाच्या निधीतून विविध विकासकामे करण्यात येतात. मात्र, लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या सुविधांचा योग्य वापर होत नसल्याने शासनाचा निधी वाया जात असल्याचे चित्र काही ठिकाणी दिसून येत आहे. गोंडपिपरी तालुक्यात सुमारे १५ लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेला बाजारओटे सध्या वापराविना पडून असून, ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे ते केवळ शोभेची वस्तू ठरत असल्याचा प्रकार तोहोगावात आढळून आला आहे. बाजार ओट्याचे वापर गुरांचा चारा ठेवण्यासाठी केल्या जात असल्याचे निदर्शनात आले आहे, अशी नागरिकांची तक्रार आहे.
गावातील आठवडी बाजार तसेच व्यापारी आणि नागरिकांच्या सोयीसाठी या बाजारओट्याचे बांधकाम करण्यात आले. मात्र बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याचा अपेक्षित वापर सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. परिणामी लाखो रुपये खर्चून उभारलेली ही वास्तू सध्या ओसाड पडली आहे.
बाजारओट्याचा वापर न झाल्याने नागरिकांकडून त्याचा कडबा, कुटार तसेच बैल व इतर जनावरांच्या चाऱ्यासाठी वापर केला जात असल्याचे दिसून येते.
सार्वजनिक उपयोगासाठी उभारण्यात आलेल्या या सुविधेची अशी अवस्था झाल्याने शासनाच्या निधीच्या विनियोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
विशेष म्हणजे, बाजारओट्याचा योग्य वापर सुरू करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असतानाही याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. संबंधित ग्रामपंचायतीच्या कारभारावर देखरेख ठेवणारे गटविकास अधिकारी यांनीही अशा प्रकारच्या कामांची पाहणी करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.



