हिंगणी येथे ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत महिला सक्षमीकरण व जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
हिंगणी- दि. ८ ऑक्टोबर २०२६ : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती सेलू अंतर्गत परिवर्तन प्रभागसंघ, हिंगणी यांच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान (सेवा मोहीम कार्यक्रम)’ प्रभागसंघ कार्यालय, हिंगणी येथे उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील महिला, बचत गट व महिला शेतकऱ्यांना विविध शासकीय योजना, आर्थिक सक्षमीकरण, बचत गटांचे कार्य तसेच महिलांच्या आरोग्याबाबत आवश्यक मार्गदर्शन व माहिती उपलब्ध करून देणे हा होता.
सदर कार्यक्रमात अंजली बारई तालुका व्यवस्थापक यांनी महिला बचत गटांच्या कार्यपद्धतीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. गावातील शिल्लक महिला यांना घेऊन उमेद मध्ये नवीन गट बांधणी करणे,गटातील आर्थिक व्यवहार पारदर्शक करणे,गटाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या विविध संधींचा उपयोग करणे तसेच बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी स्वयंरोजगार व उत्पन्नवाढीच्या दिशेने पुढे जाणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
जितेंद्र पेटकर प्रभाग समन्वयक यांनी महिलांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजना व महिला शेतकऱ्यांसाठीच्या योजनांबाबत मार्गदर्शन केले. शासनाच्या योजनांची माहिती योग्य पद्धतीने समजून घेणे,महिला शेतकरी प्रमाणपत्र काढून दिले, आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.
महिला शेतकऱ्यांनी शेतीकडे केवळ पारंपरिक पद्धतीने न पाहता शेतीपूरक व्यवसाय, पशुपालन, प्रक्रिया उद्योग, बचत गटांच्या माध्यमातून सामूहिक उपक्रम तसेच उपलब्ध शासकीय योजनांचा उपयोग करून स्वतःचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करावा, असे मार्गदर्शन करण्यात आले.
आदित्य बिर्ला ट्रस्ट – उज्जास यांच्या माध्यमातून महिलांच्या मासिक पाळीतील स्वच्छता, वैयक्तिक आरोग्य, योग्य स्वच्छतेच्या सवयी आणि आरोग्यविषयक काळजी याबाबत धन्वंतरी गव्हाळे यांनी मार्गदर्शन केले.
मासिक पाळीबाबत असलेले गैरसमज दूर करून महिलांनी आपल्या आरोग्याकडे गांभीर्याने पाहावे, स्वच्छतेच्या योग्य सवयी अंगीकाराव्यात आणि आरोग्याशी संबंधित कोणतीही अडचण असल्यास योग्य आरोग्यसेवेचा सल्ला घ्यावा, याबाबत जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमाला ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत हिंगणी, उमेद कॅडर, महिला व विविध पदाधिकारी यांची उपस्थिती होती. तसेच सर्व कॅडर, अजिंक्य सावरकर व निताताई गोमासे यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य व मार्गदर्शन केले.
कार्यक्रमामध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध विषयांबाबत माहिती जाणून घेतली. महिलांचे आर्थिक, सामाजिक व आरोग्यविषयक सक्षमीकरण करण्यासाठी अशा प्रकारच्या मार्गदर्शन कार्यक्रमांची आवश्यकता असून, ‘सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून महिलांपर्यंत विविध योजनांची व सेवांची माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सदर सेवा संकल्प अभियान हे परिवर्तन प्रभाग संघ, हिंगणी द्वारे 17 सप्टेंबर ते 18 ऑक्टोबर या दरम्यान वेगवेगळ्या गावात ग्रामसंघ मार्फत राबविण्यात आले आहेत.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिवर्तन प्रभागसंघ, हिंगणीचे सर्व पदाधिकारी व सर्व ग्रामसखी सहकार्य केले.



