भद्रावती पोलिसांची धडाकेबाज कारवाई : दोन मोटारसायकल चोरांना अटक
७० सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून नागपुरातून आरोपींचा शोध

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
मोटारसायकल चोरीच्या दोन गुन्ह्यांचा छडा लावत भद्रावती पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. भद्रावती ते नागपूर मार्गावरील सुमारे ७० सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी करून पोलिसांनी आरोपींचा माग काढला. दरम्यान, चोरीस गेलेल्या मोटारसायकलींसह आरोपींना ताब्यात घेण्यात भद्रावती पोलीस यशस्वी ठरले.
आंबेडकर नगर, भद्रावती येथील विजय गायकवाड यांची होंडा फॅशन प्रो क्रमांक एम एच ३४ ए सी २४१०, किंमत अंदाजे १० हजार रुपये ही मोटारसायकल भद्रावती बसस्थानकाजवळून चोरीला गेली होती. याप्रकरणी ४ सप्टेंबर २०२६ रोजी अप. क्र. ९१४/२०२६, कलम ३०३(२) BNS अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
दुसऱ्या घटनेत जेना येथील अमोल बेलेकर यांची यामाहा एमटी-१५ क्रमांक एम एच ३४ सी डब्लू २६२४, किंमत अंदाजे १ लाख ७५ हजार रुपये ही मोटारसायकल डोली पेट्रोल पंप परिसरातून चोरीला गेली. याप्रकरणी ५ ऑक्टोबर २०२६ रोजी अप. क्र. ९७४/२०२६, कलम ३०३(२) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणांत आशुतोष अतीराम यादव (वय १९, रा. सुनवारा, जि. सिवनी) आणि कमल मोहन दास (वय २०, रा. घणसोर, जि. जबलपूर), मध्य प्रदेश या दोघांना मुद्देमालासह अटक करण्यात आली.
भद्रावती पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष केदार, प्रशांत शेंदरे, देवानंद डुकरे, गोपाल आतकुलवार, अनुप अस्तुनकर, योगेश घाटोळे, खुशाल कावळे, संतोष राठोड आणि मोनाली गारघाटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करून नागपूरपर्यंत आरोपींचा माग काढत अटक करण्यात भद्रावती पोलिसांना मिळालेले यश कौतुकास्पद आहे.



