कोरपन्यात एमआयडीसी उभारणीच्या हालचालींना वेग
आमदार देवरावदादा भोंगळे यांच्या नेतृत्वात तीन गावांतील जागांची पाहणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना : तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना देऊन स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने कोरपना येथे एमआयडीसी स्थापन करण्याच्या मागणीने आता पुढचे पाऊल टाकले आहे. धानोलीचे उपसरपंच ओम पवार यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) पत्राद्वारे औद्योगिक वसाहत स्थापन करण्याची मागणी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने आमदार देवरावदादा भोंगळे यांच्या नेतृत्वात मौजा चनई (बूज), जेवरा आणि धोपटाळा येथील प्रस्तावित जागांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
तीन गावांतील जागांचा आढावा
कोरपना तालुक्यात औद्योगिक वसाहत उभारल्यास लघुउद्योगांना चालना मिळण्यासोबतच स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात. सध्या रोजगाराच्या शोधात इतर शहरांकडे जाणाऱ्या युवकांना स्थानिक पातळीवर कामाच्या संधी मिळाव्यात, तसेच परिसरातील आर्थिक व्यवहारांना गती मिळावी, या उद्देशाने एमआयडीसीची मागणी करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर चनई (बूज), जेवरा आणि धोपटाळा येथील प्रस्तावित जागांची पाहणी करून औद्योगिक वसाहतीच्या दृष्टीने आढावा घेण्यात आला. या पाहणीमुळे एमआयडीसी स्थापनेच्या प्रस्तावाच्या पुढील प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे. मात्र, जागांची अंतिम निवड आणि प्रशासकीय मंजुरीबाबत अद्याप पुढील निर्णय होणे अपेक्षित आहे.
स्थानिक अर्थव्यवस्थेला मिळणार बळ?
एमआयडीसीची स्थापना झाल्यास मोठ्या उद्योगांसोबतच लघुउद्योग, पूरक व्यवसाय, वाहतूक आणि अन्य सेवा क्षेत्रांना चालना मिळू शकते. त्यातून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याबरोबरच तालुक्याच्या आर्थिक व सामाजिक विकासाला हातभार लागू शकतो. त्यामुळे प्रस्तावित औद्योगिक वसाहतीची पुढील प्रक्रिया वेगाने पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अधिकारी, पदाधिकारी उपस्थित या पाहणीदरम्यान एमआयडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. गिरी, महामंत्री पुरुषोत्तम भोंगळे, अरुण रागीट, अनुसूचित जमातीचे जिल्हाध्यक्ष अरुण मडावी, जेवरा येथील तलाठी कालिदास तोडासे, धोपटाळा येथील तलाठी शीतल परतेकी, ओम पवार, रवी बंडीवार, उमेश पालीवाल, दिनेश खडसे, दिनेश ढेंगळे, धम्मकीर्ती कापसे, नैनेश आत्राम, अंकुश कोल्हे, सतीश जमदाडे, आशिष देवतळे, महेश वानखेडे, निलेश भोयर, अजय तिखट आणि राहुल ठावरी यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, एमआयडीसीचे अधिकारी व नागरिक उपस्थित



