मद्य तस्करीचे धागेदोरे नाशिकपर्यंत ; बनावट विदेशी मद्यनिर्मिती कारखान्याचा पर्दाफाश
चंद्रपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई ; ४५ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त; तिघांना अटक

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या अवैध वाहतुकीवर कारवाई करताना चंद्रपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरोरा पथकाने नाशिक जिल्ह्यातील बनावट विदेशी मद्यनिर्मिती कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा येथे एका शेतातील टिनाच्या शेडमध्ये हा कारखाना सुरू होता. या दोन्ही कारवायांमध्ये एकूण ४५ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरोरा पथकाने २३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री नंदोरी टोल नाका मार्गावरील बोर्डा चौक परिसरात बोलेरो पिकअप आणि टाटा हॅरियर या दोन वाहनांवर कारवाई केली. या वाहनांमधून गोवा बनावटीच्या रॉयल स्टॅग विदेशी मद्याची अवैध वाहतूक होत असल्याचे आढळून आले. कारवाईत १८० मिली क्षमतेच्या ३ हजार ४०८ बाटल्या आणि २ लिटर क्षमतेच्या १०२ बाटल्या, असा एकूण ८८ बॉक्स मद्यसाठा जप्त करण्यात आला. मद्यसाठ्याची अंदाजित किंमत ११ लाख ३८ हजार रुपये, तर दोन्ही वाहनांची किंमत २७ लाख रुपये असून एकूण ३८ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी टाटा हॅरियरचा वाहनचालक बादल महादेव विरुटकर (वय २६ वर्षे) याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली.
आरोपीच्या चौकशीतून बनावट मद्यनिर्मिती कारखाना उघडकीस :
अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या चौकशीतून सदर मद्यसाठा नाशिक जिल्ह्यातून आणल्याची माहिती मिळाली. त्याआधारे चंद्रपूर पथकाने २४ नोव्हेंबर रोजी पहाटे सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा येथे छापा टाकला. एका शेतातील टिनाच्या शेडमध्ये बनावट विदेशी मद्यनिर्मिती, बाटलीबंद करणे व पॅकिंगचा कारखाना सुरू असल्याचे उघडकीस आले.
या कारवाईत रॉयल स्टॅगच्या १८० मिली क्षमतेच्या १ हजार ९२० भरलेल्या बाटल्या, रॉयल इम्पॅक्टच्या ७५० मिली क्षमतेच्या १४४ भरलेल्या बाटल्या तसेच रॉयल स्टॅगच्या १ हजार ६०० रिकाम्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. याशिवाय बनावट मद्य, मद्यनिर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य, स्टिकर्स, लेबल, बाटल्यांची बुचे, कागदी खोके व अन्य पॅकिंग साहित्य असा एकूण ७ लाख ५३ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. घटनास्थळावरून आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईत नाशिक राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ‘सी’ विभाग व विभागीय भरारी पथकाचे सहकार्य लाभले.
या कारवाईमुळे बनावट विदेशी मद्यनिर्मिती आणि अवैध वाहतुकीच्या आंतरजिल्हा साखळीचा पर्दाफाश करण्यात चंद्रपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाला यश आले आहे.
यांनी केली कारवाई : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त (अंमलबजावणी व दक्षता) प्रसाद सुर्वे, नागपूर विभागाचे विभागीय उपायुक्त गणेश पाटील आणि चंद्रपूरचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
कारवाईत वरोराचे निरीक्षक दत्तात्रय वरठी, दुय्यम निरीक्षक सचिन पोलेवार, प्रमोद राजोते, सागर धिडशे, हर्षराज इंगळे तसेच जवान किशोर डोंगरे, शुभम गोवारदिपे, मंगेश कुयटे, नितेश घाटे, किशोर पेदुजवार, जगदिश मस्के आणि वाहनचालक विलास महाकुलकर, प्रविकांत निमगडे यांनी सहभाग घेतला. गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक सचिन पोलेवार करीत आहेत.
अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्रीविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे विभागाने कळविले आहे


