भद्रावती शहरातील सर्व तलावांचे खोलीकरण करा : विजय वानखेडे यांची नगर परिषदेला निवेदनाद्वारे मागणी
खासगी तलाव शासनाने आरक्षित करून गाळ उपसण्याचा प्रस्ताव सादर करावा : संभाव्य पाणीटंचाई रोखण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती शहराला तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. विशेषतः शिंगाड्याच्या उत्पादनासाठी हे शहर प्रसिद्ध आहे. शहरात माजी मालगुजारी तलावांसह मोठ्या संख्येने खासगी तलाव आहेत. मात्र, अनेक वर्षांपासून या तलावांमधील गाळ उपसण्यात आलेला नसल्याने त्यांची खोली कमी झाली असून पाणी साठवण क्षमता प्रभावित झाली आहे. त्यामुळे शहरातील सर्व तलावांचे खोलीकरण करून त्यातील गाळ काढण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा भाजपचे महामंत्री विजय वानखेडे यांनी केली आहे.
शहरातील तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने त्यांच्या पोटाची पातळी उथळ झाली आहे. परिणामी, पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचून वाहून जाते. याचा परिणाम तलावांच्या जलसाठ्यावर तसेच शिंगाड्याच्या उत्पादनावरही होत आहे. भविष्यात उद्भवणारी संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता तलावांचे संवर्धन आणि खोलीकरण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे वानखेडे यांनी म्हटले आहे.
शहरातील अनेक तलाव खासगी मालकीचे असले तरी सार्वजनिक हिताच्या दृष्टीने नगर परिषद प्रशासनाने अशा तलावांना शासनस्तरावर आरक्षित करण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यानंतर या तलावांमधील गाळ उपसणे व खोलीकरण करण्यासाठी शासनाकडे आवश्यक प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
भद्रावती शहराची तलावांची ओळख कायम राखण्यासोबतच भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घ्यावी, असे आवाहन विजय वानखेडे यांनी केले आहे.


