अवैध रेती वाहतुकी विरोधात भद्रावती पोलिसांचा छापा : ४.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त
घोडपेठ परिसरात ट्रॅक्टर-ट्रॉली पकडली : कचराळा येथील चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती :_ तालुक्यात अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. २३ नोव्हेंबर रोजी भद्रावती पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे मौजा घोडपेठ परिसरात अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीवर कारवाई करीत तब्बल ४ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे अवैध रेती वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलीस पथक परिसरात पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे घोडपेठ परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी लाल रंगाचा मॅसी फर्ग्युसन २४५ डीआय ट्रॅक्टर व रेतीने भरलेली ट्रॉली अवैधरीत्या वाहतूक करताना आढळून आली. पोलिसांनी ट्रॅक्टरचालक कृष्णा मनोहर भोयर (वय ३८, रा. कचराळा, ता. भद्रावती) याला ताब्यात घेतले.
वाहतुकीसाठी आवश्यक असलेला वैध शासकीय परवाना (रॉयल्टी) नसल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने पोलिसांनी ट्रॅक्टर, ट्रॉली व रेती असा एकूण ४ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ४८(७), ४८(८) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस स्टेशन भद्रावतीचे ठाणेदार पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने केली. या पथकात पोलीस हवालदार देवानंद डुकरे, विजय उपरे, प्रशांत शेंद्रे, योगेश घाटोळे, संतोष राठोड आणि खुशाल कावळे यांचा समावेश होता.
अवैध रेती वाहतुकीविरोधात भद्रावती पोलिसांनी सुरू केलेल्या या मोहिमेमुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले असून, अशा कारवाया सातत्याने सुरू राहणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


