ताडाळी एमआयडीसी परिसरात वाघाचा वावर ; शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण!
वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा, काँग्रेस नेते दिनेश दादापाटील चोखारे यांची मागणी
चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ जिल्ह्यातील ताडाळी एमआयडीसी परिसरातील तलावालगत असलेल्या शेतशिवारात वाघाचा वावर आढळून आल्याने शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतीची कामे सुरू असताना शेतमजुरांना वाघाचे दर्शन झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून, शेतात काम करणाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
ताडाळी एमआयडीसी परिसरातील तलावालगतच्या शेतशिवारात अनेक शेतकरी आणि शेतमजूर नियमितपणे शेतीची कामे करतात. मात्र, या परिसरात वाघाचा वावर असल्याचे समोर आल्याने शेतकऱ्यांसह शेतमजुरांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
विशेषतः सकाळी आणि सायंकाळी शेतीची कामे करताना वाघाच्या संभाव्य हल्ल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या घटनेची गांभीर्याने दखल घेत चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा काँग्रेस नेते दिनेश दादापाटील चोखारे यांनी वनविभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, अशी मागणी केली आहे. तसेच शेतकरी आणि शेतमजुरांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करून वाघाचा बंदोबस्त करावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
शेतीच्या हंगामात शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना जीव मुठीत धरून काम करण्याची वेळ येऊ नये. वनविभागाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.



