नाकाबंदीमध्ये धारदार चाकूसह तरुण ताब्यात
१.२० लाखांची बुलेटही जप्त..

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : वर्धा शहर पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान एका तरुणाला धारदार व दाते असलेल्या चाकूसह ताब्यात घेतले. ही कारवाई ५ ऑक्टोबर रोजी रात्री धुनीवाले बाबा मठ चौक, वर्धा येथे करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजिक्य सुरेशराव बोरकर (वय ३१, रा. प्लॉट क्र. ३, संघर्ष भवन, ईश्वरनगर, नालवाडी, वर्धा) हा खाकी रंगाच्या रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५० एबीएस दुचाकीने येत असताना नाकाबंदीवरील पोलिसांनी त्याला थांबवून अंगझडती घेतली. यावेळी त्याच्याकडे काळ्या रंगाच्या कापडी कव्हरमध्ये धारदार व टोकदार चाकू आढळून आला.
पोलिसांनी सुमारे ७०० रुपये किमतीचा चाकू तसेच सुमारे १ लाख २० हजार रुपये किमतीची रॉयल एनफिल्ड बुलेट (MH-32/AN-5666) असा एकूण १ लाख २० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी वर्धा शहर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक १६४०/२०२६ अन्वये शस्त्र अधिनियम तसेच मोटार वाहन कायदा व महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला ६ ऑक्टोबर रोजी पहाटे १.०२ वाजता अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार नागेशकुमार चातारकर यांच्या निर्देशानुसार करण्यात आली. कारवाईत पोलीस हवालदार सुहास चांदोरे, सचिन भारशंकर, पोलीस अंमलदार मनोज काकपुरे, नवनित वानखेडे व उमेश कुंभरे यांनी सहभाग घेतला.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार प्रशांत वंजारी करीत आहेत.



