सहा वर्षांच्या कामांची पावतीच विजयाचा मार्ग _ ॲड. अभिजित वंजारी
२५ हजारांहून अधिक मताधिक्याचा संकल्प _ पदवीधर मतदारापर्यंत पोहोचण्याचे आमदार ॲड. अभिजित वंजारी यांचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
मागील सहा वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांची पावती पदवीधर मतदार निश्चितच देतील, असा विश्वास व्यक्त करत २५ हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने विजय मिळविण्याचा संकल्प आमदार ॲड. अभिजित वंजारी यांनी व्यक्त केला. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी मूल येथे आयोजित मतदार संवाद बैठकीत ते बोलत होते. प्रत्येक कार्यकर्त्याने किमान २० पदवीधर मतदारांशी थेट संपर्क साधून त्यांना जोडून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
निवडणूक ही केवळ उमेदवाराची नसून प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीची आणि संघटनशक्तीची परीक्षा असल्याचे सांगत वंजारी यांनी कार्यकर्त्यांना नियोजनबद्ध पद्धतीने मैदानात उतरण्याचे निर्देश दिले. प्रत्येक कार्यकर्त्याने २० मतदारांची जबाबदारी स्वीकारल्यास पदवीधर मतदारांशी थेट संपर्काचे मजबूत जाळे उभे राहू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सहा वर्षांच्या कामाची पावती म्हणजेच विजयाचा मार्ग आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांनी किमान २० पदवीधर मतदारांशी संपर्क साधून त्यांना आपल्यासोबत जोडावे. कोअर टीमच्या माध्यमातून प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल. तालुकास्तरीय बैठकांमधून निवडणुकीचे काटेकोर नियोजन करण्यात येईल. पदवीधर मतदारांच्या ताकदीवर २५ हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने विजय मिळवू, असा आशावाद आमदार ॲड. अभिजित वंजारी यांनी व्यक्त केला.
*कोअर टीमच्या माध्यमातून मतदारांपर्यंत थेट पोहोच*
पदवीधर मतदारसंघातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी कोअर टीमच्या माध्यमातून विशेष नियोजन करण्यात येणार आहे.पदवीधर मतदारांच्या समस्या, अपेक्षा आणि स्थानिक प्रश्न समजून घेत त्यांच्याशी थेट संवाद साधण्यावर भर दिला जाणार आहे. केवळ निवडणुकीच्या काळात नव्हे, तर मागील सहा वर्षांत केलेल्या कामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचेही नियोजन करण्यात येत आहे.
*तालुकानिहाय बैठका आणि संघटनात्मक आढावा*
निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून प्रत्येक तालुकास्तरावर बैठका घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाणार आहे. या बैठकांमध्ये बूथनिहाय संघटन, मतदार संपर्क, कार्यकर्त्यांची जबाबदारी, स्थानिक प्रश्न आणि प्रचाराचे नियोजन यांचा आढावा घेतला जाणार आहे. प्रत्येक स्तरावरील कार्यकर्त्याला विशिष्ट जबाबदारी देऊन निवडणूक यंत्रणा अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
*‘२५ हजारांपेक्षा अधिक मताधिक्य’चे लक्ष्य*
मागील सहा वर्षांत मतदारसंघात केलेल्या कामांच्या जोरावर पदवीधर मतदारांचा विश्वास कायम असल्याचा दावा करत वंजारी यांनी २५ हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने विजय मिळविण्याचे लक्ष्य कार्यकर्त्यांसमोर ठेवले. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने प्रामाणिकपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.



