‘माझे हलके दप्तर’ उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी
सावली येथील जि. प. प्राथमिक शाळा क्र. २ चा अभिनव उपक्रम; ‘हलके दप्तर–आनंदी बालपण’चा संदेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वाढते वजन कमी करण्यासाठी सावली येथील जि. प. प्राथमिक शाळा क्र. २ मध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या सुचनेनुसार ‘माझे हलके दप्तर’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी दररोज आवश्यक तेवढीच पुस्तके व वह्या शाळेत आणाव्यात, यासाठी विषयनिहाय दिवसांचे नियोजन करण्यात आले असून, त्यातून विद्यार्थ्यांवरील अनावश्यक दप्तराचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या उपक्रमांतर्गत दररोज सर्व विषयांची पुस्तके दप्तरात आणण्याऐवजी वेळापत्रकानुसार आवश्यक पुस्तके व वह्या आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक वर्गासाठी ‘आजचे दप्तर’ या संकल्पनेनुसार आठवड्याचे वेळापत्रक तयार करण्यात आले, कोणत्या दिवशी कोणते पुस्तक व वही आणायची, याची माहिती विद्यार्थ्यांसह पालकांनाही स्पष्ट राहणार आहे.
त्यानुसार सोमवारी मराठी व गणित, मंगळवारी इंग्रजी व परिसर अभ्यास, बुधवारी मराठी व गणित, गुरुवारी उपक्रम व कला साहित्य, शुक्रवारी आवश्यक सराव वह्या, तर शनिवारी इंग्रजी व परिसर अभ्यास असे नियोजन करण्यात आले आहे.
दप्तरामध्ये अतिरिक्त पुस्तके, जादा वह्या अथवा अनावश्यक वस्तू आणू नयेत, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. तसेच आठवड्यातून एकदा शिक्षकांकडून विद्यार्थ्यांच्या दप्तराची तपासणी करून त्यातील अनावश्यक साहित्य काढून टाकण्याचा उपक्रमही राबविला जात आहे.
आनंददायी गुरुवार
‘हलके दप्तर–आनंदी बालपण’ या उपक्रमांतर्गत आठवड्यातील एक दिवस ‘दप्तरमुक्त दिवस’ म्हणून ठेवण्यात आला असून, त्याला ‘आनंददायी गुरुवार’ असे स्वरूप देण्यात आले आहे. या दिवशी विद्यार्थ्यांना वाचन, चित्रकला, खेळ, कृतीआधारित शिक्षण, गोष्टी, विविध प्रयोग आदी उपक्रमांमधून आनंददायी पद्धतीने शिक्षण दिले जाणार आहे.
वर्गात ‘माझे हलके दप्तर’ या संकल्पनेतून जनजागृती करण्यात येत असून, आवश्यक तेवढेच शैक्षणिक साहित्य आणण्याची सवय विद्यार्थ्यांना लागावी, यासाठी शिक्षकांकडून सातत्याने मार्गदर्शन केले जात आहे.
दप्तराचे अतिरिक्त वजन लहान मुलांच्या शरीरावर अनावश्यक ताण निर्माण करू शकते. त्यामुळे पुस्तकांचे ओझे कमी करून विद्यार्थ्यांना शिक्षणाचा आनंद मिळावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. शाळेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नियोजन, शिस्त आणि आवश्यक साहित्य वापरण्याची सवय निर्माण होण्यास मदत होत आहे.



